जोरदार वा-यासह पर्जन्यवृष्टीमुळे पडलेली झाडे, फांद्या तातडीने हटवून रहदारी, वाहतुक सुरळीत करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

मागील 2 दिवस कमी प्रमाणात संततधार बरसत असलेल्या पावसाचा आज दुपारी 3 वाजल्यापासून जोरदार वा-यासह वेग वाढला आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विशेषत्वाने बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरु झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभाग कार्यालयांना तातडीने सतर्क राहण्याचे निर्देश देत महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रात अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
दुपारी 3 वाजल्यापासून सायं. 6.30 वाजेपर्यंत सरासरी 62.42 मिमी इतकी पर्जन्यवृष्टी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली असून त्यामध्ये बेलापूर येथे 101.80 मिमी., नेरूळ येथे 84.40 मिमी., वाशी येथे 67.20 मिमी, कोपरखैरणे येथे 34.40 मिमी आणि ऐरोली येथे 24.30 मिमी पर्जन्यवृष्टीची नोंद झालेली आहे.
पावसासह जोरदार वा-यामुळे वाशी ते बेलापूर परिसरात झाडे व झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्याच्या 25 घटनांची नोंद महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षात झाली आहे. तथापि वा-याचा वेग पहाता यापेक्षा अधिक प्रमाणात वृक्षहानी झाली असेल हे लक्षात घेऊन ही पडलेली झाडे व झाडाच्या मोठ्या फांद्या त्वरीत हटवून वाहतुकीला व रहदारीला होणारा अडथळा दूर कऱण्याच्या सूचना आयुक्तांनी अग्निशमन व उद्यान विभागाला दिल्या.
त्याचप्रमाणे जोरदार वा-यामुळे महात्मा गांधी नगर, नेरूळ येथील कॉरी परिसरातील साधारणत: 15 झोपड्यांचे छप्पर उडाल्याने 50 हून अधिक माणसे उघड्यावर आली. त्यांना नेरूळ विभाग कार्यालयामार्फत तातडीने महानगरपालिकेच्या शिरवणे शाळेत स्थलांतरीत करण्यात आले असून त्यांची निवारा व भोजन व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
जोरदार वा-यासह मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या असून त्याचे निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या संबधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनीही अशा जोरदार पर्जन्यवृष्टीच्या काळात घरातच अथवा सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन केले आहे.
अशा काळात नागरिकांना जाणवणा-या अडचणी दूर करण्याकरिता महानगरपालिकेच्या सर्व 8 विभाग कार्यालयात 24 तास मदत केंद्रे तैनात असून त्यासोबतच महानगरपालिकेच्या पाचही अग्निशमन केंद्रांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 x 7 कार्यरत आहेत. तरी नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाशी 1800222309 / 2310 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 022 - 27567060 / 61 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.
Published on : 05-08-2020 17:15:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update