उपचारांच्या देयक रक्कमेत प्रथमदर्शनी विसंगती आढळणा-या 10 रूग्णालयांना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिल्या कारणे दाखवा नोटीसा
कोव्हीड 19 बाधित रूग्णांवर त्यांच्या लक्षणांस अनुरूप योग्य प्रकारे उपचार केले जावेत व त्या उपचारांसाठी खाजगी रूग्णालयांकडून दि. 21 मे 2020 रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक बाबीसाठी निश्चित केलेले वाजवी शुल्क आकारले जावे याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी जारी केले आहेत.
या आदेशामध्ये वैद्यकीय उपचार, सुविधा व देयक अशा सर्व बाबींवर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून रूग्णालयनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या नोडल अधिकारी यांनी त्याबाबतच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
त्यापूर्वीही महानगरपालिकेच्या वतीने खाजगी रूग्णालयांना दि. 21 मे 2020 च्या शासन अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारण्यात यावी असे सूचित करण्यात आले होते. तथापि काही खाजगी रूग्णालयांकडून रूग्णांवरील उपचाराची अवाजवी आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (1) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत रूग्णालय देयकांबाबतच्या विशेष लेखा परीक्षण पडताळणी समितीच्या वतीने या देयकांच्या पडताळणीमध्ये प्रथमदर्शनी दोष आढळलेल्या 10 खाजगी रूग्णालयांना महानगरपालिकेमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी करण्याचे व मृत्यू दर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून कोव्हीड 19 रूग्णांवरील उपचारांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. 21 मे 2020 रोजीच्या अधिसूचनेतील प्रपत्र - क नुसार निश्चित केलेल्या दरांनेच खाजगी रूग्णालयांनी उपचार करणे बंधनकारक असल्याने त्याचीही काळजी घेण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकाही रूग्णाची आर्थिक फसवणूक होऊ नये ही आयुक्तांची भूमिका असून दि. 10 ऑगस्ट 2020 रोजीच्या खाजगी व धर्मादाय रूग्णालयांना देण्यात आलेल्या आदेशाव्दारे तसे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयातील देयकाबाबत कोणत्याही नागरिकाची काही तक्रार असल्यास अतिरिक्त आयुक्त (1) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत रूग्णालय देयकांबाबतच्या विशेष लेखा परीक्षण पडताळणी समितीकडे लेखी तक्रार करण्यात यावी असे सूचित करण्यात येत आहे. जेणकरून सदर तक्रारीचे निराकरण 24 तासात करणे शक्य होईल.
खाजगी रूग्णालयाकडून कोणत्याही रूग्णाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे अथवा देयक रक्कमेमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आल्यास सदर रूग्णालयावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत या 10 रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
Published on : 12-08-2020 15:16:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update