कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद - दीड दिवसांच्या 3225 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन
कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात बनविण्यात आलेल्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांना पसंती देत नवी मुंबईकर नागरिकांनी 3225 श्रीगणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले आणि कोव्हीड 19 बाबतच्या स्वयंशिस्तीचा तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश स्वकृतीतून दाखवून दिला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पारंपारिक 23 मुख्य विसर्जन स्थळे आहेत. तथापि यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सींगचे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नागरिकांना सोयीचे होईल अशाप्रकारे प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव निर्मितीचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभाग अधिकारी यांनी पोलीस विभागासह विभागनिहाय सर्वेक्षण करून 135 जागा निश्चित केल्या होत्या. त्याठिकाणी 4 मीटर X 3 मीटर आकाराचे कृत्रिम तलाव महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने अत्यंत कमी कालावधीत तयार केले.
नागरिकांना या कृत्रिम तलावांच्या ठिकाणांची माहिती व्हावी याकरिता मुख्य चौक, मोक्याच्या जागा याठिकाणी तलावांची स्थळे नमूद असलेली होर्डींग लावण्यात आली. सोशल मिडीयावरून त्याचा व्यापक प्रचार करण्यात आला. लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनीही कृत्रिम तलावाची माहिती नागरिकांना पोहचविण्यात पुढाकार घेत कृत्रिम तलावात विसर्जनाचे आवाहन केले. या सर्व प्रयत्नांना नवी मुंबईकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी दीड दिवसांच्या एकूण 6438 श्रीगणेशमूर्तींपैकी 50 टक्केहून अधिक म्हणजेच 3225 श्रीगणेशमूर्तींचे विभागांमधील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
यामध्ये - बेलापूर विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 347 घरगुती व 7 सार्वजनिक,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 348 घरगुती व 2 सार्वजनिक,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 387 घरगुती व 11 सार्वजनिक,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 318 घरगुती व 20 सार्वजनिक,
कोपरखैरणे विभागात – 14 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 746 घरगुती व 30 सार्वजनिक,
घणसोली विभागात - 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 372 घरगुती व 18 सार्वजनिक,
ऐरोली विभागात – 22 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 391 घरगुती व 17 सार्वजनिक व
दिघा विभागात – 7 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 191 घरगुती व 20 सार्वजनिक
अशाप्रकारे तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 3100 घरगुती व 125 सार्वजनिक अशा एकूण 3225 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
या सर्व कृत्रिम विसर्जन तलावांच्या ठिकाणी संबंधित विभाग कार्यालयांच्या कर्मचारी वर्गासह स्वयंसेवक व सुरक्षारक्षक तैनात होते. दोन्ही परिमंडळांचे उपआयुक्त तसेच सर्व विभागांचे सहा. आयुक्त यांचे विसर्जन व्यवस्थेवर लक्ष होते. यावर्षी विसर्जन स्थळांमध्ये वाढ होऊनही योग्य नियोजनामुळे सर्व 23 मुख्य व 135 कृत्रिम विसर्जनस्थळांवरील विसर्जन सोहळा अत्यंत सुव्यवस्थित रिताने संपन्न झाला. नागरिकांकडूनही घराजवळच उपलब्ध करून देण्यात आलेल्या विसर्जन स्थळ व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सर्व विसर्जनस्थळांवर ओले व सुके निर्माल्य वेगवेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते. यापुढील विसर्जनदिनीही महानगरपालिकेमार्फत अशाच प्रकारची सुयोग्य व्यवस्था मुख्य 23 विसर्जन स्थळांप्रमाणेच या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर असणार आहे.
Published on : 25-08-2020 16:15:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update