कोरोनाबाधित दिवंगत महापालिका कर्मचारी यांच्या वारसांना कामगार कल्याण निधीची रक्कम प्रदान
कोरोना विरोधातील लढाईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना कोरोना बाधितांचा शोध, तपासणी, उपचार कार्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभांगातील अधिकारी, कर्मचारी अथक काम करीत आहेत. या अधिकारी, कर्मचारी यांना काम करताना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याकडे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे कटाक्षाने लक्ष असून कोरोना बाधित होणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा उपचार कालावधी व बरे होऊन वैद्यकीय सल्ल्याने कामावर रूजू होण्याचा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेतील जे अधिकारी, कर्मचारी कोव्हीड 19 शी संबंधित काम करीत असताना दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडतात त्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या 'प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' या योजनेअंतर्गत रु.50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"मधून "विशेष सानुग्रह अनुदान" म्हणून रू. 25 लक्ष अशी एकूण रू. 75 लक्ष रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य सेवेव्यतिरिक्त महानगरपालिका आस्थापनेवरील कोरोना विषयक सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्य या कार्यवाहीच्या कर्तव्यावर असणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"तून रुपये 50 लक्ष रक्कमेचे "विशेष सानुग्रह अनुदान" देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विमा कवच योजना समितीच्या दि. 25 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये 2 दिवंगत वाहनचालक कर्मचारी यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या 'प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' योजने अंतर्गत रु. 50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' बँकेव्दारे मिळणेबाबतची पुढील कार्यवाही करणे व त्यांचे वारस तपासून महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून प्रत्येकी 25 लक्ष रक्कमेचे विशेष सानुग्रह अनुदान देणेस मंजूरी देण्यात आली. तसेच दिवंगत कनिष्ठ अभियंता यांच्या वारसास महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"तून रुपये 50 लक्ष रक्कमेचे "विशेष सानुग्रह अनुदान" देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.
त्यानुसार दिवंगत वाहन चालक संभाजी भास्कर यशवंतराव यांच्या पत्नी श्रीम. जयश्री संभाजी यशवंतराव यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"मधून "विशेष सानुग्रह अनुदान" म्हणून रू. 25 लक्ष रक्कमेचा धनादेश अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. इतरही दोन कर्मचा-यांच्या वारसांना विशेष सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान करण्यात येत आहे.
Published on : 05-09-2020 13:10:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update