*आता 16 जानेवारीपर्यंत घेता येणार 'नमुंमपा ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल' मध्ये सहभाग*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सद्यस्थितील कोव्हीड प्रभावित परिस्थिती व कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावली लक्षात घेऊन ऑनलाईन “न.मुं.म.पा. स्पोर्टस फेस्टिव्हल 2021-22” चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन प्रवेश नोंदणी करण्याची अंतिम तारीख 05 जानेवारी 2022 पर्यंत जाहीर करण्यात आली होती. तथापि अनेक खेळाडू व संस्था यांचेकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार सदर स्पर्धा प्रवेशाची मुदत 16 जानेवारी, 2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
या क्रीडाविषयक उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे व त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता या अभिनव स्वरुपाच्या ऑनलाईन “न.मुं.म.पा. स्पोर्टस फेस्टिव्हल 2021-22” चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये “बुध्दीबळ स्पर्धा”, “योग स्पर्धां” तसेच “बास्केटबॉल स्किल चॅलेंज”, “फुटबॉल स्किल चॅलेंज”, आणि “फिटनेस चॅलेंज” अशा विविध ऑनलाईन स्पर्धांचा समावेश आहे.
स्पर्धा सहभागाकरिता महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली असून info@sfaplay.com या आयडीवर ई-मेल व्दारे अथवा 022-49558095 या दूरध्वनी क्रमांकावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सर्व स्पर्धा वय वर्षे 14, 17, 19, 30 आणि खुल्या पुरुष व महिला अशा वयोगटात आयोजित करण्यात येत आहेत.
या स्पर्धा दि. 26 जानेवारी 2022 ते दि. 12 फे्ब्रुवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात तसेच प्रत्यक्ष मैदानात घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून प्रथम ऑनलाईन फेरीत पात्र ठरणा-या प्रत्येक खेळनिहाय गटातील 20 खेळाडूंची अंतिम फेरीकरीता निवड करण्यात येऊन त्यांची अंतिम फेरी प्रत्यक्षात मैदानावर घेण्यात येतील.
या स्पर्धेमधील प्रत्येक गटातील अंतिम तीन पुरुष व तीन महिला विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी खेळाडूंना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.
तरी नवी मुंबई महानगरपालिका आयोजित “ऑनलाईन स्पोर्टस फेस्टिव्हल 2021-22” मध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी केलेले आहे.
/navimumbai/assets/251/2022/01/mediafiles/Sports_Department_Ad_Marathi.pdf
/navimumbai/assets/251/2022/01/mediafiles/Sports_Department_Ad_English.pdf
Published on : 07-01-2022 12:51:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update