कोव्हीड रूग्णांवर विनापरवानगी उपचार करणा-या से.28, वाशीतील पामबीच हॉस्पिटलवर 15 दिवस निलंबनाची कारवाई - महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आदेश
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेत 'ट्रेस, टेस्ट व ट्रिट' ही त्रिसूत्री प्रभावीरित्या राबविण्यावर भर दिला जात असून त्या अनुषंगाने कोरोना रूग्णांवर त्यांच्या लक्षणांनुसार योग्य उपचार व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीने कोव्हीड रूग्णांवर उपचार करताना रूग्णालयांकडून आय.सी.एम.आर. तसेच महाराष्ट्र शासन यांच्या कोव्हीड उपचारविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाणे आवश्यक आहे. तथापि काही रूग्णालयांकडे कोव्हीड रूग्णांवर उपचार करण्याची रितसर परवानगी नसताना उपचार केले जात असल्याचे निदर्शनास येत असून ही बाब कोव्हीड रूग्णांवर योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य आहे.
कोव्हीड बाधिताचा मृत्यू होऊ नये हे ध्येय नजरेसमोर ठेवून कोव्हीड रूग्णांवरील उपचाराच्या दृष्टीने अत्यंत सतर्कतेने काम करणा-या महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या ही महत्वाची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलत अशाप्रकारे कोव्हीड रूग्णांवर विनापरवानगी उपचार करणा-या रूग्णालयास नोटीस बजावली होती. अखेरीस त्या नोटिशीस उत्तर न देणा-या सेक्टर 28 वाशी येथील पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या रूग्णालयास त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या शेवटच्या कोव्हीड रूग्णाच्या डिस्चार्जनंतर पुढील 15 दिवस रूग्णालयातील बाह्यरूग्ण व आंतररूग्ण सेवा (OPD & IPD) बंद ठेवण्याचा निलंबित आदेश निर्गमित केला आहे.
कोव्हीड रूग्णांवरील उपचारांसाठी आय.सी.एम.आर. व महाराष्ट्र शासनामार्फत विहित कार्यप्रणाली निश्चित करण्यात आलेली असून त्यानुसार कोणत्याही रूग्णालयाने विहित पध्दतीनेच उपचार प्रणाली राबविणे गरजेचे आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा - 1897 ची योग्य अंमलबजावणी करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांस सक्षम प्राधिकारी म्हणून शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून कोव्हीड रूग्णांवर विनापरवानगी उपचार करून नियमांचे उल्लंघन करणा-या सेक्टर 28, वाशी येथील पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या रूग्णालयास 15 दिवसांचे निलंबन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलेले आहेत.
Published on : 24-09-2020 10:54:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update