वाशी रेल्वे स्टेशन व इनॉर्बिट मॉलच्या कर्मचा-यांचीही विशेष शिबिर राबवित कोव्हीड तपासणी
एपीएमसी मार्केट, एम.आय.डी.सी. क्षेत्रातील कंपन्या अशा इतर शहरांतून ये-जा करणा-या नागरिकांमुळे कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड टेस्टींगवर विशेष भर दिला जात आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात अशा आस्थापनांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांच्याही टेस्टींगवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यानुसार आज वाशी रेल्वे स्टेशन आणि अनॉर्बिट मॉलच्या कर्मचा-यांसाठी विशेष कोव्हीड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वाशी रेल्वे स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छता व इतर काम करणा-या कंत्राटी कर्मचा-यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. यामध्ये 376 कर्मचा-यांची अँटिजेन टेस्टींग तसेच 29 जणांची आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात आली. ॲटिजेन टेस्टींगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 2 कोरोना बाधितांना लगेच विलगीकरण करण्यात आलेले आहे व त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आलेली आहे.
अशाचप्रकारे वाशी येथील इनॉर्बिट मॉलमधील 202 अधिकारी, कर्मचारी यांची आँटिजन टेस्टींग करण्यात आली असून त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेला नाही.
'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही बंधने राखून व सुरक्षेच्या नियमांचे पालन करून विविध गोष्टी टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जात असताना प्रत्येकानेच अधिक काळजी घेणे गरजेचे असून महानगरपालिकेने हाती घेतलेल्या मिशन ब्रेक द चेन अंतर्गत रूग्णशोधावर भर दिला जात आहे. जेणेकरून पॉझिटिव्ह रूग्णापासून प्रसारित होणारी कोरानाची साखळी लगेच खंडीत होईल.
याकरिता टेस्टींगवर भर दिला जात असून 22 अँटिजेन टेस्टींग सेंटरप्रमाणेच सोसायट्या, वसाहतींमध्ये जाऊन टेस्टींग करणा-या 34 मोबाईल व्हॅन कार्यरत आहेत. याशिवाय वर्दळीच्या भागांमध्ये, आस्थापनांमध्येही विशेष तपासणी शिबिरे राबविण्यावर भर दिला जात आहे.
Published on : 05-10-2020 16:26:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update