स्वच्छ नवी मुंबईचा लौकिक उंचावणारी भूमीगत कचराकुंडीची अभिनव संकल्पना
'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांत तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाल्यानंतर आता 'निश्चय केला - नंबर पहिला' असा निर्धार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त करीत महात्मा गांधी जयंतीपासून 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' च्या कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच वेगवेगळ्या अभिनव संकल्पना राबविलेल्या आहेत. तसेच स्वच्छता अभियानाच्या अनुषंगानेही प्रत्येक वर्षी उल्लेखनीय उपक्रम हाती घेतले आहे. अशाच प्रकारचा भूमीगत कचराकुंडीसारखा एक स्वच्छताविषयक आगळावेगळा उपक्रम एल अँड टी सीवूड लिमी. या कंपनीच्या सीएसआर निधीतून करावेगांव येथे दोन ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आलेला आहे. पामबीच मार्गालगत श्रीबामणदेव भूयारी मार्गाजवळ तसेच श्रीगणेश तलावानजिक ह्या भूमीगत कचराकुंडया उभारण्यात आलेल्या असून त्यांचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक श्री. विनोद म्हात्रे, एल अँड टी कंपनीचे प्रकल्प प्रमुख श्री. आकाश खत्री, श्री. अभय कामठणकर, श्री. भावेश सेजपाल, श्री. अखिल पाल्हेरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छ, सुंदर शहराचा बहुमान मिळविणा-या नवी मुंबई शहरामध्ये कचराकुंडी ठेवणे गरजेचे आहे अशा दाट लोकवस्तींच्या ठिकाणी ठेवाव्या लागणा-या कचराकुंड्या या शहराच्या सुशोभिकरणाला साजेशा असाव्यात व त्यांच्यामुळे शहराच्या स्वच्छतेत भर पडावी या भूमिकेतून या भूमीगत कचराकुंड्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या कचाराकुंडी भोवतालचा परिसर शोभिवंत फुलझाडे लावून सुशोभित करण्यात आलेला आहे.
या भूमीगत कचराकुंड्यामध्ये ओला कचरा व सुका कचरा असे दोन भाग असून पायाने पायडल दाबल्यानंतर कुंडीचे छोटे झाकण उघडते व कचरा टाकून झाल्यानंतर पायडलवरून पाय काढल्यावर ते बंद होते. त्यामुळे कचरा नजरेसमोर न राहता तो भूमीगत कुंडीत पडतो आणि सर्वसाधारणपणे कचराकुंडीमुळे दिसणारे दुर्गंधीचे वातावरण टाळले जाते. यामध्ये ओल्या व सुक्या कच-यासाठी 1.1 क्युबिक मीटरच्या स्वतंत्र कचराकुंड्या असून कचरा वाहून नेण्यासाठी रिफ्युज कॉम्पॅक्टर आल्यानंतर हायड्रोलिक सिस्टिमव्दारे या भूमीगत कचराकुंड्या वर आणल्या जातील व त्यामधील कचरा कॉम्पॅक्टरमधून वाहून नेला जाईल. यामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भूमीगत कचराकुंड्या जमिनीच्या वर आणून त्यामधून कचरा काढण्याची व त्या कुंड्या पुन्हा पूर्ववत जागी ठेवण्याची यांत्रिक प्रक्रिया रिफ्युज कॉम्पॅक्टरच्या बॅटरीवरच करण्यात येत आहे.
एल अँड टी कंपनीच्या सीएसआर निधीतून राबविली जाणारी भूमिगत कचराकुंड्यांची ही अभिनव संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकाला साजेशी असून त्यासाठी सहकार्य करणा-या एल. अँड टी. समुहाचे आभार व्यक्त करीत अशा संकल्पनांमुळेच आपण आपला स्वच्छतेतील क्रमांक अधिक उंचावू असा विश्वास अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
Published on : 09-10-2020 15:21:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update