'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुस-या टप्प्याला सुरूवात

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीमेचा पहिला टप्पा नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ऑक्टोबरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आता 14 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील सर्वेक्षणाला जबाबदारीने सुरूवात करण्यात आलेली आहे.
मोहीमेच्या पहिल्या टप्प्याकरिता राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या 3,16,449 कुटुंब सर्वेक्षणाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 3,35,469 कुटुंबांचे सर्वेक्षण महानगरपालिकेच्या 670 पथकांनी व्यवस्थितरित्या पूर्ण केले आहे. यामध्ये तब्बल 10,53,896 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. आता दुस-या टप्प्यात आधीच्या सर्वेक्षणात नोंदणी करण्यात आलेल्या कुटुंबांना ही पथके पुन्हा भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती घेऊन शासनाच्या ॲपमध्ये नोंदविणार आहेत.
मुख्यमंत्री ना.श्री.उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीमेचे मुख्य उद्दिष्ट कोरोनाबाधितांचा जलद शोध घेऊन त्यांना उपचाराच्या कक्षेत आणणे व त्यांच्यापासून कोरोनाचा संभाव्य प्रसार टाळणे हे आहे. या मोहीमेला सुसंगत अशी कार्यवाही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेऊन सुरूवातीपासूनच राबविली असून 'जलद रूग्णशोध (ट्रेस), त्यांची तपासणी (टेस्ट), त्वरित उपचार (ट्रिट )' या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिलेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी शासनाचे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष दिले. महानगरपालिका क्षेत्रात दररोज होणा-या सर्वेक्षणाचा वेबिनारव्दारे विभागनिहाय बारकाईने आढावा घेतला. एखाद्या विभागात कमी सर्वेक्षण झाल्यास त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने दूर केल्या. यातूनच 670 पथकांनी तब्बल 3 लक्ष 35 हजार 469 कुटुंबांचे सर्वेक्षण करून 10 लक्ष 53 हजार 896 नागरिकांची आरोग्यविषयक माहिती नोंदीत करून घेतली.
दोन ते तीन जणांचे प्रत्येक पथक दररोज 50 ते 55 घरांना भेट देऊन त्या कुटुंबातील सदस्यांची माहिती नोंदवित होते तसेच त्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळीही मोजून नोंदणी करून घेत होते. आता 14 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यात हीच पथके पहिल्या टप्प्यात भेटी दिलेल्या घरांमध्ये पुन्हा जाऊन त्या नागरिकांचे सद्यस्थितीतील शारीरिक तापमान तसेच ऑक्सिजन पातळी तपासून नोंदविणार आहेत. यामधून या आधीच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या आरोग्यस्थितीची नोंदणी झालेली असल्याने त्यांच्या आरोग्य स्थितीतील फरक जाणून घेता येणार आहे. याव्दारे पहिल्या सर्वेक्षणानंतर कोणाला काही त्रास झाला आहे काय, याची माहिती मिळणार आहे व तसे कोणी आढळल्यास त्याला आवश्यक ती वैद्यकीय मदत करणे व त्याचा फॉलोअप घेणे सोयीचे होणार आहे.
त्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याचीही माहिती पुन्हा घेतली जाणार आहे. यामध्ये विशेषत्वाने ज्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाणार आहे.
त्याचप्रमाणे नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशी कोरोनापासून बचाव करण्याची तंत्रे सांगितली जात असून त्यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच आजाराची लक्षणे न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, काही सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) असल्यास नियमित औषधोपचार घेणे, एखादा कोरोनाबाधित बरा झाला असल्यास इतरांच्या आरोग्य हितासाठी त्यांना प्लाझमा डोनेशनसाठी प्रोत्साहित करणे अशा विविध प्रकारची माहिती देऊन पथकांमार्फत व्यापक स्वरूपात जनजागृतीही केली जात आहे.
पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात घेतलेली नागरिकांची माहिती महानगरपालिकेकडे उपलब्ध असल्याने दुस-या टप्प्यात त्या नागरिकांचे सद्यस्थितीतील शारीरिक तापमान व ऑक्सिजन पातळी मोजून ॲपमधील त्यांच्या नावासमोर नोंदविली जाणार आहे. त्यामुळे दुस-या टप्प्यातील सर्वेक्षणाकरिता या पथकांना दररोज 75 ते 100 घरांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
याशिवाय पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात जी घरे बंद आढळली, ती घरे उघडी आढळल्यास त्या कुटुंबाचीही सर्वेक्षणात नोंद केली जाणार आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान सर्व नागरिकांच्या आरोग्य स्थितीची पडताळणी करून त्यांना कोरोनाच्या या काहीशा दडपणाच्या वातावरणात आश्वस्त करणारे असून या सर्वेक्षणात केवळ कोरोनाविषयकच नाही तर इतरही आजारांसाठी आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी या पथकांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.
नवी मुंबईकर नागरिक नेहमीच चांगल्या कामात सहकार्य करण्यासाठी आघाडीवर असतात. त्यानुसार 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातही नवी मुंबईकर नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभल्यानेच शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक चांगली कामगिरी नवी मुंबई महानगरपालिका करू शकली असून आता दुस-या टप्प्यातील आरोग्य सर्वेक्षणासाठी घरोघरी येणा-या महानगरपालिकेच्या पथकांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 18-10-2020 15:46:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update