स्वच्छताविषयक प्रोत्साहनासाठी स्वच्छ सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट स्पर्धेचे आयोजन
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान संपादन केलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 करीता देशात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा संकल्प केला असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यादृष्टीने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. स्वच्छताविषयक कार्यात नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला सहभाग राहिल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने आपले मानांकन नेहमीच उंचावत नेलेले आहे. त्या अनुषंगाने या लोकसहभाग वाढीवर भर देण्यात असून त्याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सध्या कोव्हीड 19 च्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात असून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींग राखणे अशा आरोग्य सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांचे विविध माध्यमांतून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याच बरोबरीने स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन स्वच्छतेविषयी देखील व्यापक स्वरूपात माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती करण्यात येत आहे. रहिवाशांना कचरा वर्गीकरण व त्यावरील प्रक्रिया तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करणे तसेच या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवून नागरिकांच्या स्वच्छताविषयक सवयींमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.
स्वच्छताविषयक चांगले काम करणा-या व्यक्ती, संस्था यांना प्रोत्साहित करणे व त्यामधून इतरांसाठी प्रेरणा निर्माण करणे याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. (1) स्वच्छ हॉटेल, (2) स्वच्छ शाळा (खाजगी व नमुंमपा), (3) स्वच्छ गृहनिर्माण संस्था / RWA, (4) स्वच्छ मार्केट असोसिएशन, (5) स्वच्छ शासकीय कार्यालय आणि (6) स्वच्छ हॉस्पिटल अशा सहा प्रमुख गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण (Source Segregation), कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा आणि कोव्हीड-19 आजाराचा प्रसार रोखण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन असे विविध निकष गुणांकनाकरिता असणार आहेत.
या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या संस्थांनी 26 ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज दाखल करावयाचा आहे. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन दि. 02 ते 20 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत करण्यात येणार आहे.
या स्वच्छता स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्सहन मिळावे याकरीता विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.21 हजार, रु.15 हजार व रु.11 हजार अशी रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह वितरित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.51 हजार, रु.41 हजार व रु.31 हजार रोख बक्षिसे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांचेसह प्रदान केली जाणार आहेत.
स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खाजगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.15 हजार व रु.11 हजार रोख बक्षिस तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खाजगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.25 हजार व रु.21 हजार रोख बक्षिस हे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपस्रासह प्रदान करण्यात येणार आहे.
स्वच्छ मार्केट करीता प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या मार्केंटना अनुक्रमे रु.25 हजार व रु.21 हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे.
स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय, स्वच्छ हॉस्पिटल व स्वच्छ प्रभाग या विभागातील प्रथम व द्वितीय विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून निकोप स्पर्धेतून नागरिकांना प्रेरणा मिळावी याकरिता आयोजित स्वच्छता स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ नवी मुंबई मिशन यशस्वीपणे राबविण्यात प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-10-2020 14:55:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update