अपघाती ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी कालबध्द उपाययोजनांचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
.jpeg)
देशातील दरवर्षी होणा-या मृत्यूंचा तपशील पाहिला असता रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर नागरिक मृत्यूमुखी पडत असल्याचे निदर्शनास येते. अगदी सध्याच्या कोव्हीड काळाचा विचार केला तरी कोव्हीडमुळे मृत्यूमुखी पडणा-यांपेक्षा अधिक माणसांचा दरवर्षी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू होत असतो. त्याकरिता रस्ता सुरक्षेचा गांभीर्याने विचार करीत शहरांतील अपघात प्रवण क्षेत्रात (Accidental Spot) सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी दिल्ली इन्टीग्रेटेड मल्डीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (DIMTS) यांचेमार्फत प्राप्त अहवालानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने 26/10/2018 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. त्या परिपत्रकास अनुसरून महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिकेतही 'रस्ता सुरक्षा समिती' गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत शहरातील अपघात प्रवण क्षेत्राच्या (ब्लॅक स्पॉट) ठिकाणी अपघात होऊ नये याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत या रस्ता सुरक्षा समितीच्या विशेष सभेमध्ये वाहतुक पोलीस विभागामार्फत सूचित करण्यात आलेल्या नवी मुंबई शहरातील 36 अपघातप्रवण क्षेत्रांविषयी (ब्लॅक स्पॉट) सविस्तर चर्चा करण्यात आली. या ब्लॅक स्पॉट्सवर आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रम ठरवून तत्परतेने व कालबध्द रितीने करण्याचे आदेश याप्रसंगी आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील पुढील महिन्यातील समितीच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अभियांत्रिकी विभागास दिले.
या बैठकीस समिती सदस्य शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीम. हेमांगिनी पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त श्री. पुरुषोत्तम कराड उपस्थित होते. आय.आय.टी. मुंबईचे प्राध्यापक तथा समिती सदस्य श्री. के.व्ही. कृष्णराव, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्राध्यापक श्रीम. मंजूळा देवी या मान्यवर समिती सदस्यांनी वेब संवादाव्दारे बैठकीत सहभाग घेतला. समितीच्या सदस्य सचिव कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे तसेच कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई, श्री. अजय संख्ये, श्री. अरविंद शिंदे, श्री. सुभाष सोनावणे, श्री. अनिल नेरपगार, श्री. मनोज पाटील, श्री. गिरीष गुमास्ते, श्री. मनोहर सोनावणे, श्री. मदन वाघचौडे, श्री. सुनिल लाड, श्री. प्रविण गाडे हे देखील बैठकीप्रसंगी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन वाहतुक पोलीस विभागाने पाहणी करून व तपशील तपासून निश्चित केलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 36 ब्लॅक स्पॉटवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले व त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांमार्फत देण्यात आले.
याविषयी 'नमुंमपा नागरी रस्ता सुरक्षा (परीक्षण) सुधारणा आराखडा (NMMC URBAN ROAD SAFETY (AUDIT) IMPROVEMENT PLAN)' तयार करण्यासाठी नियुक्त सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्युशन यांचेमार्फत शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करण्यात आला व त्यामधून तयार केलेल्या अहवालाचे सादरीकरण (PRESENTATION) या बैठकीमध्ये मे. टंडन अर्बन सोल्युशनचे प्रतिनिधी श्री. रविंद्र एस. यांनी केले. या सादरीकरणाव्दारा महानगरपालिका परिसरातील 36 अपघात प्रवण क्षेत्रांचा (ब्लॅक स्पॉट) विस्तृत आढावा घेण्यात आला. या सर्व क्षेत्रांचे तांत्रिकदृष्ट्या सर्वेक्षण करून त्याठिकाणी सल्लागारांमार्फत सूचविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, थर्मोप्लास्ट पेंट, कॅटाईज ब्लिंकर्स, रम्बलर अशा तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अधिक प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती व वाहतुकीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या त्या क्षेत्राच्या गरजेनुसार रोलर क्रॅश बॅरिअर, पादचारी पुल, रोड जॉमेट्री इंम्प्रुव्हमेंट, टेबल टॉप क्रॉसिंग, पथदिवे व्यवस्थेत वाढ अशा उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.
या सूचीत 36 ब्लॅक स्पॉटमधील तातडीने कार्यवाही करण्याची गरज असलेल्या प्रामुख्याने अरेंजा कॉर्नर सिग्नल ते कोपरीगांव सिग्नल, मोराज सिग्नल ते एन.आर.आय. सिग्नल, अन्नपूर्णा सर्कल ते माथाडी सर्कल सिग्नल, सायन पनवेल हायवेवरील सानपाडा जंक्शन अशा 4 ब्लॅक स्पॉटवर त्वरीत कार्यवाही कऱण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले. तसेच या 4 ठिकाणांप्रमाणेच उर्वरित 32 स्पॉटवरही सुयोग्य नियोजन करून कालबध्द पध्दतीने तत्परतेने काम करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.
नवी मुंबई शहर हे देशातील आधुनिक शहरांमध्ये वेगळेपण जपणारे शहर म्हणून नावाजले जाते. नवी मुंबई शहराची ओळख अपघातमुक्त शहर व्हावी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत 'रस्ता सुरक्षा समिती' त्या दृष्टीने कार्यवाही करीत आहे.
Published on : 31-10-2020 13:57:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update