रंगभूमीचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सूट
कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये विविध व्यवसायांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले असून त्यामधून नाट्य व्यवसायही सुटलेला नाही. रंगभूमी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याने नाट्य व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वाशी येथील महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या सध्या आकारण्यात येणा-या भाड्यात 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार 25 टक्केच भाडे आकारणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने रंगभूमी दिनाच्या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. तथापि अशाप्रकारे 50 टक्के क्षमतेत प्रयोग करताना प्रयोगासाठी होणारा खर्च आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीवर आधारित उत्पन्न यांचा ताळमेळ बसणे शक्य नाही तसेच तिकीट दर वाढविणे अव्यवहार्य ठरेल. त्यामुळे आपला सांस्कृतिक वारसा जपणा-या या व्यवसायावर अवलंबून असणा-या मोठ्या वर्गाचा विचार करून नाट्यगृहाच्या भाड्यात सवलत देण्याची मागणी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ यांच्या वतीने सुप्रसिध्द अभिनेते व नाट्यनिर्माते श्री. प्रशांत दामले यांनी सर्व नाट्यकर्मींच्या वतीने आयुक्तांची भेट घेऊन केली होती.
या विनंतीपत्रास अनुसरून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पुढील 6 महिने म्हणजेच 31 मे 2021 पर्यंत किंवा 50 टक्के उपस्थितीचा निर्बंध असेपर्यंत अथवा या दोघांपैकी जे अगोदर होईल तोपर्यंत मराठी रंगभूमीशी निगडीत मराठी कार्यक्रमांकरिता विष्णुदास भावे नाट्यगृहाचे भाडेदरात 75 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नाट्यगृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या निम्म्या प्रेक्षक संख्येलाच परवानगी देण्यात आल्याने कोरोना काळात झळ बसलेल्या नाट्य व्यवसायाला दिलासा देणारा व सांस्कृतिकता वृध्दींगत करणा-या रंगभूमीला मदतीचा हात देणारा निर्णय घेतल्याबद्दल नाट्यकर्मींकडून समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Published on : 25-11-2020 13:47:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update