पथनाट्यांतून उलगडले स्वच्छतेचे जनजागृतीपर पैलू

नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिस-या क्रमांकावर असून यावर्षी पहिल्या क्रमांकावर येण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून आपली वाटचाल सुरू आहे. यामध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग सर्वात मोलाचा असून त्यादृष्टीने आयोजित विविध कला स्पर्धांना उत्साहवर्धक प्रतिसाद लाभत आहे ही समाधानकारक बाब आहे. अशाच प्रकारे पथनाट्य स्पर्धेतही सहभागी समुहांनी स्वच्छताविषयक वैविध्यपूर्ण सादरीकरण केले ते अभिनंदनीय असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ अंतर्गत ‘खुली पथनाट्य स्पर्धा’ पारितोषिक वितरण प्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहा. आयुक्त तथा स्पर्धेच्या परीक्षक श्रीम. संध्या अंबादे व परीक्षक नाट्यकर्मी श्री. राजेश कोळंबकर आदी मान्यवर उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आपल्या मनोगतात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणाला आपण सामोरे जात असल्याचे सांगत सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांतून निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला. अत्यंत अल्प कालावधीत 22 पथनाट्ये या स्पर्धेत सहभागी झाली याचा विशेष उल्लेख करीत यामधून युवा पिढीच्या मनातील स्वच्छतेविषयीच्या जाणीवांचे दर्शन घडले अशा शब्दात त्यांनी स्पर्धेत सहभागी तरूणाईचे कौतुक केले.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ रंगकर्मी श्री. राजेश कोळंबकर यांनी लॉकडाऊनच्या काळानंतर नुकतीच नाट्यप्रयोग करायला शासन परवानगी मिळाली असून त्यानंतर लगेच नवी मुंबई महानगरपालिकेने या स्पर्धांच्या माध्यमातून हौशी कलाकारांना भावे नाट्यगृहासारखे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून लॉकडाऊनच्या मानसिक दडपणातून बाहेर काढल्याबद्दल कौतुक केले. सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायजर अशा सर्व कोव्हीड सुरक्षा उपाययोजनांचे पालन करून महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहभागी कलावंत भाग्यवान आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. काळानुरूप पथनाट्य सादरीकरणाचेही संदर्भ बदलत चाललेहेत असे भाष्य करीत स्वच्छतेसारख्या आपल्या दैनंदिन जीवनाशी, आरोग्याशी निगडीत विषयांवर सादर झालेली सर्व पथनाट्ये संहितेपासून सादरीकरणापर्यंत विविधतेने नटलेली होती याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
‘स्वच्छ शहर’ विषयावर आधारित सहभागी 22 पथनाट्यांतून आर्टिस्ट प्लॅनेट समुहाच्या पथनाट्याने प्रथम क्रमांकाचे रू. 5 हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र पारितोषिकासह विजेतेपद पटकाविले. सत्कर्व समुह तसेच कला अविष्कार या समुहांची पथनाट्ये अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. नाट्यसृष्टी आणि प्रणाम थिएटर्स हे दोन समुह उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त ठरले. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 15 आणि शाळा क्र. 101 यांना उल्लेखनीय सादरीकरणाची प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धा आयोजानासाठी विशेष परिश्रम घेणारे उपअभियंता निखील काळे, लिपिक हेमंत कोळी, आरंभ क्रिएशन्स संस्थेच्या वैदेही व्यवहारे, मिलींद खानविलकर यांना याप्रसंगी सन्मानीत करण्यात आले.
कोरोना कालावधीतील लॉक़डाऊनच्या प्रदीर्घ काळानंतर रंगमंचीय कार्यक्रमास परवानगी प्राप्त झाल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्पर्धेच्या रूपाने नाट्य कलावंताना हे व्यासपीठ खुले झाले व तेही स्वच्छतेसारख्या महत्वाच्या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला.
Published on : 30-11-2020 13:21:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update