सफाई कर्मचा-यांचाही पहिल्या नंबरचा एकमुखी निर्धार

"निश्चय केला, नंबर पहिला' अशी सामुहिक घोषणा देत प्रत्यक्ष शहर स्वच्छतेत महत्वाची भूमिका निभावणा-या सफाई कर्मचा-यांनी सध्याच्या देशातील तिस-या क्रमांकावरून नवी मुंबईला यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये पहिल्या क्रमांकावर न्यायचेच असा निर्धार व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने महापालिका मुख्यालयातील अँम्फिथिएटरमध्ये सफाई कर्मचा-यांची स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांक संपादन करण्याचे उद्दिष्ट आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आपल्या सर्वांच्या विश्वासावर नजरेसमोर ठेवले असून यामध्ये प्रत्यक्ष जागेवर स्वच्छतेचे काम करणा-या सफाई कर्मचा-यांची सर्वात महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. आपण मनाशी ठरवले आणि त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे सांगत त्यांनी आपण स्वच्छतेचे काम तर मनापासून करावेच शिवाय नागरिकांनी कचरा टाकून शहर अस्वच्छ होऊच नये याकरिता त्यांचे प्रबोधनही करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी पहिल्या नंबरचा निश्चय करताना त्यासोबत येणा-या कामाच्या जबाबदारीची उपस्थित सफाई कर्मचा-यांना जाणीव करून देत आत्तापर्यंत स्वच्छतेची मिळालेली मानांकने आपल्या सर्वांच्या मनापासून केलेल्या कामामुळेच मिळालेली असल्याचा अभिमानाने उल्लेख केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सफाई कामगारांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी आवश्यक साधने पुरवून घेतली जात असून शहर स्वच्छतेचे चांगले काम करणा-या सफाई कामगारांचा नुकताच विभागवार सत्कार करण्यात आला होता, त्यापुढे जात आणखी वेगळ्या अभिनव स्वरूपात सफाई कामगारांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सफाई कर्मचा-यांपासून ते अधिका-यांपर्यंत आपल्या कामात अधिक सुधारणा करून व नागरिकांमध्येही जाणीवजागृती निर्माण करून देशात पहिल्या नंबरचे उद्दिष्ट आपण साध्य करू असा विश्वास व्यक्त करीत यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांच्यासह सर्वांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली व शपथेनंतर 'निश्चय केला - नंबर पहिला' अशी एकसाथ घोषणा देत निर्धार व्यक्त केला.
Published on : 21-12-2020 11:45:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update