नव्या स्वरूपातील कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सज्ज राहण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश
ब्रिटन आणि काही इतर देशांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आल्याने राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना सावध रहावे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव ठाकरे यांनी विशेष वेबसंवादाव्दारे दिल्यानंतर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने सर्व नोडल ऑफिसर, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सर्व रूग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिका-यांशी वेबसंवाद साधत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र शासनामार्फत 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वा. पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे काटेकोर पालन व्हावे याकरिता हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब यांना पोलीसांप्रमाणेच महानगरपालिकेमार्फतही लेखी सूचना देण्यात याव्यात असे आदेश देत याचे उल्लंघन करणा-यांवर पोलीसांच्या मदतीने कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
यासोबतच मास्क, सोशल डिस्टन्सींग आणि वारंवार हात धुणे ही कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री अंगिकारणे व "कोव्हीड बचावात्मक अनुकूल वर्तन (COVID Appropriate Behavior)" ठेवणे महत्वाचे आहे. जे नागरिक बेजबादारपणे सुरक्षा नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावरील कारवाई अधिक प्रभावीरित्या राबविण्याचेही निर्देश विभाग अधिकारी यांना देण्यात आले.
ब्रिटनवरून येणा-या प्रवाशांवर बृहन्मुंबई महानगरपालिका लक्ष देत असून त्या प्रवाशांना मुंबईतच 7 दिवस क्वारंटाईन करण्यात आहे. 7 दिवसानंतर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या प्रवाशांना त्यांच्या क्षेत्रात 7 दिवस क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात येतील. अशा नवी मुंबईत येणा-या प्रवाशांवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे काम आपल्याला करायचे असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि विभाग अधिकारी यांना दिले.
परदेशातून प्रवास करून येणा-या प्रवाशांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विमानतळ प्रशासन यांचेकडून प्राप्त केली जाणार असून आयसीएमआर च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
इतर देशांमधून येणा-या प्रवाशांशी कॉल सेंटरच्या माध्यमातून नियमित संपर्क ठेवला जाणार असून त्यांच्यामध्ये कोव्हीड सदृष्य लक्षणे दिसून येत आहेत काय यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनांनुसार सध्या दररोज 3 हजाराच्या आसपास असलेले कोव्हीड 19 टेस्टींगचे प्रमाण अधिक वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये विशेषत्वाने आरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्याचे सूचित करण्यात आले.
कोरोनाचा विषाणू नव्या रूपात परदेशामध्ये वेगाने पसरताना दिसत असून त्याचा धोका नवी मुंबईकर नागरिकांना बसू नये याकरिता महापालिका प्रशासन अत्यंत दक्षतेने आवश्यक उपाययोजना करीत आहे. यामध्ये नागरिकांचेही संपूर्ण सहकार्य अपेक्षित असून या विषाणूपासून दूर राहण्यासाठी सतत हात धुणे तसेच मास्कचा नियमित वापर करणे आणि सोशल डिस्टन्सींग राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या रोज कमी होताना दिसत असली तरी नागरिकांनी गाफील न राहता सुरक्षेची त्रिसूत्री पाळण्यात दक्षता राखावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-12-2020 14:26:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update