अभय योजनेच्या कालावधीतही करभरणा न करणा-या थकबाकीदारांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

मालमत्ताकर भरणा करणे ही प्रत्येक मालमत्ताकर धारकाची जबाबदारी असल्याची जाणीव नागरिकांना करून द्यावी व अभय योजनेचा लाभ घेणेबाबत थकीत मालमत्ताकर धारकांशी संपर्क साधून त्यांना प्रामुख्याने ऑनलाईन करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे सूचित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ऑनलाईन करभरणा प्रक्रियेची एक प्रॉपर्टी कोड टाकून प्रत्यक्ष पाहणी केली व त्यामध्ये नागरिकांना सुलभ होईल अशा महत्वाच्या सुधारणा सूचवित त्या तत्परतेने अंमलात आणाव्यात असे निर्देश दिले.
मालमत्ताकर अभय योजना 15 डिसेंबरपासून सुरू झाली असून आठवड्याभराच्या कालावधीत प्रत्येक करवसूली अधिका-यास देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत किती प्रमाणात वसूली झाली याबाबतच्या प्रगतीचा आढावा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला व कामाला अधिक गती देण्याचे निर्देशित केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व विविध विभागांचे मालमत्ताकर वसूली अधिकारी उपस्थित होते.
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला याची जाणीव असल्याने दिलासादायक अभय योजना लागू करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी अनेक मोठे थकबाकीदार महानगरपालिकेस कर भरत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ती लक्षात घेता अशा मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करून वसूलीची कारवाई करावी असे यावेळी सूचित करण्यात आले.
कोव्हीड प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी असूनही 1 एप्रिलपासून 21 डिसेंबरपर्यंत 187 कोटी मालमत्ताकराची वसूली झाली आहे. त्यामध्ये मालमत्ताकर अभय योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून एका आठवड्यात 24 कोटी 18 लक्ष इतकी वसूली झालेली आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासाठी नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
विशेषत्वाने करभरणा करण्यासाठी कोणत्याही नागरिकाला महापालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये अशाप्रकारे 'झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट' तत्वानुसार कर भरण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुलभ करावी व ती प्रभावीरित्या राबवावी असे आयुक्तांनी स्पष्ट शब्दात निर्देश दिले.
मागील बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार मालमत्ताकर विभागाच्या कामकाजाची प्रमाण कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली असून त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अभय योजना लागू करूनही त्या कालावधीत करभरणा न करणा-या थकबाकीदारांवर त्यानंतर बॅंक अकाऊंट गोठविणे, मालमत्ता जप्ती करणे अशा प्रकारची नियमानुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी असणा-या नागरिकांवर प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
75 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक रक्कमेवर माफीची सुवर्णसंधी असलेल्या या अभय योजनेचा लाभ घेऊन, 25 टक्के दंडासह आपला थकीत मालमत्ताकर भरणा-या नागरिकांचे स्वागत असेल असे स्पष्ट करीत आयुक्तांनी अशा लाभार्थींना प्रोत्साहनपर प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले.
अभय योजना सुरू होऊन आठवड्याचा कालावधी झाला असला तरी काही थकबाकीदारांनी पहिल्या आठवड्यातच योजनेला प्रतिसाद देऊन थकीत कराचा भरणा केला आहे. अभय योजनेचा लाभ घेताना एम.आय.डी.सी. नेरूळ मध्ये प्लॉट क्र. डी-185/186 येथील मे.जी.एस.सेठी अँड सन्स यांनी 48 लक्ष 66 हजार 279 इतकी तसेच से.38, नेरूळ येथे प्लॉट क्र. 6 वरील मे. के स्टोन लाईफस्पेस प्रा.लि. यांनी 30 लाख 35 हजार 650 इतकी थकीत मालमत्ताकर अधिक 25 टक्के दंडात्मक रक्कम भरणा करून शहराच्या विकासाप्रती आपले योगदान दिलेले आहे.
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याने नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी मालमत्ताकर वसूली चांगलीच झाली पाहिजे. त्यामध्ये अभय योजना ही थकबाकीदारांना दंडावर 75 टक्के रक्कमेचा दिलासा देणारी असल्याने तिची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावेत, दिलेले उद्दिष्ट पूर्ततेसाठी अधिक गतीमानतेने काम करावे व महत्वाचे म्हणजे नागरिकांना ऑनलाईन पेमेंटचा सर्वात सुलभ पर्याय जास्तीत जास्त कसा वापरता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या व नवी मुंबईकर थकबाकीदार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
Published on : 24-12-2020 07:06:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update