सहकारी संस्था सहनिबंधकांचे नवी मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण, विल्हेवाटीचे निर्देश

नवी मुंबई क्षेत्रामध्ये सिडको भूखंडावरील सर्व सहकारी गृहनिर्माण / प्रिमायसेस संस्थांच्या व्यवस्थापक समितीला सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई यांचे सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांच्या वतीने, महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960 चे सुधारीत कलम 154 (ब) (27) (1) नुसार, सुका, ओला व घरगुती धोकादायक कचरा स्वतंत्रपणे देणे त्याचप्रमाणे 50 किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निर्मिती होते अशा संस्थांनी संस्थेच्या आवारातच कम्पोस्ट करणे बंधनकारक असल्याचे निर्देश 22 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेले आहेत.
केंद्र शासनाकडील अधिसूचना क्र. एस.ओ.1357, दि.08 / 04 / 2016 अन्वये घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 लागू करण्यात आलेले आहेत. या नियमांतर्गत प्रत्येक कचरा निर्मात्या नागरिकांनी विघटनशील (कुजणारा किंवा ओला) व अविघटनशील (न कुजणारा किंवा सुका) आणि घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे / एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. या नियमाची प्रभावी अंमलबजावणी नवी मुंबई शहरामध्ये सुरु आहे.,
त्यास अनुसरून सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच प्रिमायसेस सहकारी संस्था यांनी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 च्या नियमानुसार वर्गीकृत कचरा महानगरपालिकेने नेमून दिलेल्या व्यक्ती / एजन्सीकडे देणे बंधनकारक असल्याने तसेच ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत 50 किलो पेक्षा जास्त दैनंदिन कचरा निघतो अशा संस्थांनी संस्थेच्या आवारात कंपोस्ट करणे बंधनकारक असल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे निर्दशित केले आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्था व प्रिमायसेस सहकारी संस्था यांचेकरिता सहनिबंधकानी निर्गमित केलेल्या या निर्देशपत्रात, आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच नवी मुंबई महानगरपालिकेला 'स्वच्छ सर्व्हेक्षण 2020' मध्ये महाराष्ट्रात पहिला व देशात तिसरा क्रमांक मिळालेला असल्याचे प्रामुख्याने नमूद केले असून प्रत्येकाने ओला, सुका व घरगुती धोकादायक अशा तीन प्रकारच्या कचरा वर्गीकरणाबाबत, आणि 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती होते अशा गृहनिर्माण संस्थानी कचरा विल्हेवाटीबाबत, घनकचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश दिलेले आहेत. यामुळे नवी मुंबईतील कचरा वर्गीकरण व कचरा विल्हेवाट कामाला गती लाभणार आहे.
Published on : 28-12-2020 10:55:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update