वाशीप्रमाणेच ऐरोली व नेरूळ रूग्णालये संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे नियोजनबध्द वाटचाल
ऐरोली येथील महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयास महापालिका आयुक्तांनी 3 डिसेंबरला अचानक भेट देऊन व पुढे लगेच 8 डिसेंबरला वाशी रूग्णालय व 21 डिसेंबरला नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयाच्या आकस्मिक भेटीतून तेथील आरोग्य स्थितीची काटेकोर पाहणी केली होती. यामधून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी वाशी रूग्णालयातील सेवांमध्ये गुणात्मक वाढ आणि ऐरोली व नेरूळ रूग्णालयांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी तेथील आरोग्य सेवा वाढींवर भर देण्याचे आयुक्तांनी निश्चित केले.
महानगरपालिकेच्या नेरूळ व ऐरोली येथील रूग्णालयाच्या ब-याच वर्षांपासून बांधून ठेवलेल्या प्रशस्त इमारती नागरिकांच्या आरोग्य सेवेकरिता उपयोगात आणण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी संबंधितांना कालबध्द नियोजनानुसार काम करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार होत असलेल्या कार्यवाहीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सातत्याने आढावा बैठका घेत काटेकोर लक्ष दिले जात आहे.
या दोन्ही रूग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यात 15-15 बेड्सची सुविधा असणारे पुरूष व महिलांसाठी मेडिकल वॉर्ड्स आणि 10 बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरू 1 जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक उपकरणे व साहित्य उपलब्धता, औषधे उपलब्धता, डॉक्टर-नर्सेससह आरोग्यविषयक मनुष्यबळाची पूर्तता याविषयी यापूर्वीच दिलेल्या निर्देशांवर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष कार्यवाहीचा आयुक्तांनी रूग्णालयनिहाय सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके आणि तिन्ही रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते.
या आढाव्यामध्ये सर्वसाधारण व आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर, मल्टिपॅरा मॉनिटर, सिरींज पम्प, इन्फुजन पम्प अशा आवश्यक उपकरणांची पूर्तता करण्यात आली आहे तसेच आवश्यक औषध पुरवठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री आयुक्तांनी करून घेतली. तसेच अंतिम टप्प्यातील सिव्हील व इलेक्ट्रिकल कामे 2 दिवसात पूर्ण करावीत असे निर्देश दिले.*
गॅस पाईपलाईनचे सुरू असलेले काम जलद रितीने 2 ते 3 दिवसांत पूर्ण करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे रूग्णालये कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक एम.डी. फिजिशिअन व एम.बी.बी.एस. आणि इतर डॉक्टर, नर्सेसचे नियोजनही 30 तारखेपर्यंत करण्याचे निर्देश दिले.
मनुष्यबळासह सर्व उपलब्धता जलद करून 1 जानेवारीपासून ट्रायल रन घेण्यात यावी व त्यानंतर रूग्ण दाखल करण्यास सुरूवात करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
सध्या कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहिली असता कोव्हीडचा प्रभाव कमी होत चालल्याचे दिसून येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड उपचारार्थ सुरू केलेली 9 कोव्हीड केअर सेंटर व 2 डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहेत. तसेच कोव्हीड काळात डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालय म्हणून रूपांतरित केलेले वाशी येथील महानगरपालिका सार्वजनिक रूग्णालय आता कोव्हीड व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी पूर्वीप्रमाणे खुले केलले आहे. सद्यस्थितीत वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड हेल्थ केअर सेंटर आणि डॉ.डी. वाय. पाटील रूग्णालयातील आयसीयू व व्हेंटिलेटर्स सुविधा करोनाबाधीत नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात डायलेसिस सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध असूनही नागरिकांकडून त्याचा तितक्या प्रमाणात लाभ घेतला जात नाही हे पाहणी दौ-यातील निरीक्षण अधोरेखित करीत आयुक्तांनी याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यापक प्रसिध्दी करावी असे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे ऐरोली व नेरूळ येथील रूग्णालयात पोस्ट कोव्हीड सेंटर सुरू असल्याचीही माहिती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक प्रचार करावा अशा सूचना दिल्या.
महानगरपालिका रूग्णालयात उपचारासाठी येणारा रूग्ण हा सामान्यत: सर्वसामान्य असल्याने महानगरपालिकेची रूग्णालये संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकडे आयुक्तांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ऐरोली व नेरूळ रूग्णालयात जानेवारीपासून मेडिकल व आयसीयू वॉर्ड सुरू करणे तसेच दुस-या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये सर्जिकल वॉर्ड्स व शस्त्रक्रिया सुरू करणे असे नियोजन करण्यात आलेले आहे. हे प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यासाठी करावयाच्या कामाचे टप्पे व त्याच्या पूर्ततेचा कालावधी ठरवून दिला असून त्यानुसार कार्यपूर्ततेचा आयुक्तांकडून नियमित आढावा घेतला जात आहे.
Published on : 29-12-2020 10:56:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update