ऐरोली व नेरूळ रुग्णालयात मेडिकल व आयसीयू वॉर्ड्स अद्ययावत सुविधांसह तयार रूग्णसेवा त्वरित कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या प्रशस्त इमारती रुग्णसेवेसाठी संपूर्ण क्षमतेने वापरात याव्यात यादृष्टीने या दोन्ही रुग्णालयात पहिल्या टप्प्यात मेडिकल वॉर्ड व आयसीयू कक्ष कार्यान्वित करण्याबाबत मागील एक महिन्यापासून नियोजन करण्यात येत आहे. त्याबाबतच्या कार्यवाहीची अंतिम पाहणी करताना आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या सुविधा त्वरित सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. सदर सुविधा सुरु करण्याच्या दृष्टीने स्थापत्य व विदुयत विषयक पायाभूत सुविधा, आवश्यक उपकरणे व साहित्य, औषध पुरवठा तसेच मनुष्यबळ यांची पूर्तता करण्यात आली असून सदयस्थितीत सदर सुविधा कार्यान्वित करण्यासाठी अंतिम चाचणी घेतली जात आहे.
महानगरपालिकेच्या नेरुळ व ऐरोली या दोन्ही रुग्णालयांच्या प्रशस्त वास्तुंमध्ये मोठया प्रमाणावर जागा उपलब्ध आहे, मात्र त्या जागेचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नाही. त्यामुळे जागेच्या देखभाल-दुरुस्तीवर होणारा खर्च आरोग्य सेवेच्या प्रत्यक्ष प्रयोजनासाठी उपयोगात येत नाही. या जागेचा योग्य कारणासाठी पूर्ण क्षमतेने वापर व्हावा व नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जावी या भूमिकेतून आयुक्तांनी या बाबीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
त्या दृष्टीने रुग्णालय इमारतींचा पूर्ण क्षमतेने वापर होण्याकरिता याचे कालबध्द नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात या दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी 15-15 बेड्सचे पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र मेडिकल वॉर्डस् व 10 बेड्सचे आयसीयू वॉर्डस् सुरू होत आहेत.
पहिल्या टप्प्यात हे दोन्ही वॉर्ड व्यवस्थित कार्यान्वित झाले की पुढल्या टप्प्यात आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत सर्जिकल, ऑर्थोपेडिक,ऑप्थॅलमोलॉजी आणि इतर विभागही त्यांच्या सर्जरीसह सुरु करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने स्थापत्य व विदयुत विषयक कामे करण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी आवश्यक असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्थाही कंत्राटी स्वरुपात करुन घेण्यात येत आहे.
आयुक्तांच्या मागील दौऱ्यांमध्ये आढळलेल्या डॉक्टरांची अनुपस्थिती व इतर बाबींमध्ये सुधारणा करण्याबाबत सर्व रूग्णालयांना निर्देशित करण्यात आले आहे. रुग्णालयातील एखादी वैदयकीय सुविधा संबंधितांच्या गैरहजेरीमुळे बंद राहणे अत्यंत चुकीचे असून याबाबत सर्वच महापालिका रुग्णालयांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच रुगणेसेवेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड नजरेआड केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सद्यस्थितीत पुरेशा संख्येने स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ उपलब्ध असून त्यांच्या सेवांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून रूग्णसेवेला अधिक योग्य न्याय देता येईल अशाप्रकारे नियोजन करण्यावर विशेष भर दयावा अशा सूचना आयुक्तांनी ऐरोली व नेरुळ रुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षकांना दिल्या. सद्यस्थितीत सुरू असलेल्या स्त्रीरोग, बालरोग, प्रसुती आंतररूग्ण सेवेतील रूग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून आयुक्तांनी तेथील सुविधांच्या गुणवत्तेचा दर्जा जाणून घेतला.
रुग्णसेवा हे आपले प्रथम प्राधान्य असून आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून काम करण्याची भूमिका सर्वांनी जपावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आगामी दोन महिन्यात ऐरोली व नेरुळ ही दोन्ही रुग्णालये संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन रूग्णसेवेसाठी सज्ज झालेली नागरिकांना दिसतील असा विश्वास आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 07-01-2021 07:48:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update