मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कवी अरुण म्हात्रे यांनी उलगडला साहित्य व समाजाचा संबंध

साहित्यामधून आपल्याला इतर प्रदेश, तेथील माणसे, तिथली संस्कृती, समाज कळतो. त्यामुळे साहित्य हे इतरांना समजून घेण्याचा आधार असून त्यामधून समाजाचे चित्र प्रतिबिंबीत होते असे सांगत सुप्रसिध्द कवी श्री. अरुण म्हात्रे यांनी पुस्तकांशी मैत्री करावी व समृध्द व्हावे असे आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित 'साहित्य आणि समाज' या विषयावर सुसंवाद साधताना त्यांनी मराठी भाषेची थोरवी स्पष्ट केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. क्रांती पाटील, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका 18 ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासनेचे चांगले काम करत असून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असे आवाहन श्री. अरूण म्हात्रे यांनी याप्रसंगी केले. माणसाला बोलता येणे हे इतर प्राण्यांपेक्षा मिळालेले वरदान असून लिहिण्यामुळे माणसाला मनातील गोष्टी व्यक्त करता येतात असे सांगत त्यांनी नववधूच्या मनातील संदिग्ध भावना चितारणा-या कवी सौमित्र यांच्या कवितेचे उदाहरण दिले.
ज्या प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी वाचणारे असतात ते संवेदनशील असतात आणि ते प्रशासन लोकाभिमुख असते, हा अनुभव मला नवी मुंबई महानगरपालिकेत आला असे श्री. अरुण म्हात्रे यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड वाचन होते त्यामुळे कॅलिफोर्नियामधील त्यांच्या छायाचित्राखाली 'जगातील सर्वात ज्ञानी व्यक्ती' असा ज्यावेळी उल्लेख होतो त्यावेळी वाचनाचे महत्व आपल्याला कळते.घर कितीही सजवलेले असले तरी त्याला पुस्तकांचे कपाट वेगळी समृध्दी प्रदान करते असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या मुलांना लहानपणापासूनच वाचनाची आवड लावा आणि त्यांचे कल्पनाविश्व समृध्द करा असे आवाहन करीत श्री. अरुण म्हात्रे यांनी वाचनामुळे दृष्टी बदलते व प्रगती होते, त्यामुळे साहित्याच्या महासागरात मनसोक्त डुंबून जा असा संदेश दिला.
मंगेश पाडगावकर, विं.दा. करंदिकर, ना.धों.महानोर, विठ्ठल वाघ, नारायण सुर्वे, अशोक नायगावकर, महेश केळुस्कर अशा नामवंत कवींच्या सादरीकरणाच्या पध्दतीचे अविष्करण करत ते दिवस आता कुठे या स्वत:च्या गाजलेल्या कवितेमधील नवीन कडव्यांचे सादरीकरण त्यांनी केले.
अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांनी साहित्य आपल्याला समाजाशी जोडते असे सांगत विविध वाचनीय पुस्तकांची उदाहरणे दिली. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब सापडते, त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील लोकांचे अनुभवविश्वही नंतरच्या काळात आलेल्या साहित्य कृतीतून प्रभावीपणे उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. विविध दिन आपल्याला चांगल्या गोष्टींचे स्मरण करून देण्यासाठी आयोजित केले जातात असे सांगत श्री. संजय काकडे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा आपल्याला मराठी भाषेशी व साहित्याशी जोडून आपल्याला समृध्द करण्याचे स्मरण देण्यासाठी आयोजित केला जात असल्याचे सांगितले.
समाज विकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम.क्रांती पाटील यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून ग्रंथालय विभागामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. 27 जानेवारी रोजी सायं. 5.00 वाजता महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात महापालिका अधिकारी, कर्मचारी हे आवडलेल्या पुस्तकातील प्रेरणादायी भागाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करणार असून दि. 28 जानेवारी रोजी सायं. 5.00 वा. सुप्रसिध्द गझलकार श्री. ए.के.शेख, डॉ. कैलास गायकवाड व श्री. जनार्दन म्हात्रे स्वरचीत मराठी गझलांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती श्रीम. क्रांती पाटील यांनी दिली.
Published on : 25-01-2021 11:50:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update