ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी केली नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी

भोकरपाडा, पनवेल येथे शासकीय कार्यक्रमानिमित्त आलेले महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राला भेट देऊन तेथील जलवितरण प्रणालीची महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली व त्याठिकाणच्या अत्याधुनिक स्वयंचलीत यंत्रणेची प्रशंसा केली. याप्रसंगी पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील उपस्थित होते.
स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई महानगरपालिका ही स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एकमेव महानगरपालिका आहे. महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून गुरुत्व जलवाहिनीव्दारे पाणी भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र याठिकाणी आणले जाऊन तेथे त्यावर शुध्दीकरण प्रक्रिया केली जाते. माथेरान सारख्या नैसर्गिक भागातून येणा-या पाताळगंगा नदीची उपनदी असणा-या धावरी नदीवर हा मोरबे प्रकल्प असून हा संपूर्ण परिसर वृक्षसंपदेने वेढलेला असल्याने येथील पाणी मुळचेच शुध्द आहे. त्यावर भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रात विविध प्रक्रिया करून अधिक शुध्द केले जाते. हे शुध्द पाणी चॅनलव्दारे तेथील टाकीत साठवले जाऊन पुढे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाठविले जाते.
भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राला पाण्याची गुणवत्ता राखणे याकरिता आयएसओ 9001-2015 या गुणवत्ता प्रमाणपत्राने प्रमाणित करण्यात आले असून सन 2015 पासून सातत्याने गुणवत्ता राखत हे प्रमाणपत्र अद्ययावत ठेवण्यात आले आहे. यामाध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलवितरण कार्यप्रणालीवर मान्यतेची मोहर उमटलेली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून डिसेंबर 2009 मध्ये भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र महानगरपालिकेस हस्तांतरीत झाले असून त्यावेळी त्याची क्षमता 300 द.ल.लि. होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पाची क्षमता प्रती दिन 450 द.ल.लि. असल्याने महानगरपालिकेने जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता 150 द.ल.लि. ने वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व पायाभूत सुविधा उभारल्या व जून 2012 पासून केंद्राची क्षमता 450 द.ल.लि. केली. या सर्व प्रक्रियेची व जलवितरण तंत्रज्ञानविषयक उपकरणांची बारकाईने पाहणी करीत पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
Published on : 22-02-2021 14:34:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update