जात वैधता प्रमाणपत्राकरिता निवडणूक विभागात अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम 5 ब मधील तरतुदीनुसार उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास शासनाने वेळोवेळी सवलत दिली असून दि. 22 ऑगस्ट 2019 च्या अध्यादेशानुसार सवलतीची मुदत दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविली होती. तथापि सदर अध्यादेशाचे रुपांतर अधिनियमात झालेले नसल्याने दि. 18 मार्च 2020 रोजीच्या राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे पत्रानुसार आता उमेदवाराने नामनिर्देश पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक झाले आहे.
यामध्ये निवडणूकीमध्ये राखीव जागांवरून निवडणूक लढविणा-या इच्छुक उमेदवारांना जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याने उमेदवारांनी त्यांची जात वैधता प्रमाणपत्रे वेळीच काढून घ्यावीत असे सूचित करण्यात आले आहे.
त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यापासून कोणीही वंचीत राहू नये यादृष्टीने इच्छुक उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या महापालिका मुख्यालयातील कार्यालयात प्रभाग क्रमांक नमूद करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत अर्जदाराने मतदार यादीमधील आपले नाव नमूद असलेल्या अनुक्रमांक व भाग क्रमांकाच्या पृष्ठाची छायांकित प्रत, जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत तसेच नावात बदल असल्यास (महिलांकरिता) आपल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची / गॅझेटची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. अशाप्रकारे इच्छुक उमेदवारांचे प्राप्त अर्ज महानगरपालिका निवडणूक विभागामार्फत तात्काळ जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात येतील.
तरी इच्छुक उमेदवारांनी पूरक कागदपत्रांसह महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन महापालिका आयु्क्त तथा निवडणूक अधिकारी श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-02-2021 10:47:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update