मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ दंडात्मक रक्कमेवर 15 मार्चपर्यंत 75% आणि 16 ते 31 मार्चपर्यंत 50% सवलत
कोव्हीड काळात लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले हे लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती व या योजनेस 1 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
तरीही अभय योजनेस आणखी काही काळ मुदतवाढ दिल्यास दंडात्मक रक्कमेवरील सवलतीचा लाभ घेता येईल अशी विनंती नागरिक, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांच्या माध्यमातून आयुक्तांकडे करण्यात येत होती. या विनंती, सूचनांचा विचार करून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभय योजनेस अंतिम मुदतवाढ देताना त्यामध्ये दोन भाग केले असून मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 15 मार्चपर्यंत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर आधीप्रमाणे 75% सूट तशीच ठेवलेली आहे. तथापि त्यानंतर 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत दंडात्मक रक्कम भरावयाची असल्यास त्यावर 50% इतकीच सूट मिळेल असे जाहीर केले आहे.
त्यामुळे मालमत्ताकर थकबाकीदारांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात 15 मार्चपर्यंत मालमत्ताकराची थकबाकी अधिक 25% दंडात्मक रक्कम भरून 75% इतक्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक रक्कमेवरील सवलतीचा लाभ घ्यावा. आणि त्या कालावधीत रक्कम भरणा करणे शक्य होत नसल्यास 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत रक्कम भरून 50% इतक्या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% पर्यंत सूट देणा-या या अभय योजनेचा लाभ आत्तापर्यंत अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणाववर घेतला असून अभय योजनेअंतर्गत 1 मार्च 2021 पर्यंत 112 कोटी 32 लक्ष इतकी रक्कम प्रत्यक्ष जमा झालेली आहे. तसेच अभय योजनेचा लाभ घेताना नागरिकांना 60 कोटी 10 लक्ष रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेची सूट मिळालेली आहे. अशा रितीने थकबाकीची एकूण 172 कोटी 42 लक्ष इतकी रक्कम कमी झालेली आहे.
मालमत्ताकरापोटी सन 2020 - 2021 या वर्षात 1 एप्रिल 2020 ते 1 मार्च 2021 पर्यंत रु. 440 कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे. या अभय योजनेस अजून थोडा कालावधी वाढवून मिळावा अशा प्रकारच्या अनेक विनंत्या आयुक्तांकडे प्राप्त झाल्याने ही मुदतवाढ 31 मार्चपर्यंत दोन टप्प्यात देण्यात आलेली आहे.
यानुसार मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबईकर नागरिक 15 मार्च 2021 पर्यंत मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25% दंडात्मक रक्कम भरणा करून त्यांच्या दंडात्मक रक्कमेवर 75% इतकी मोठी सूट मिळवू शकतात. त्यानंतर 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत दंडात्मक रक्कमेवर 50% इतकीच सूट मिळणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी 15 मार्चच्या आधी अगदी आजच या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन दंडात्मक रक्कमेवर 75% इतकी भरघोस सूट घ्यावी अन्यथा त्यानंतर 16 मार्च ते 31 मार्चपर्यंत दंडात्मक रक्कमेवरील 50% सवलतीचा लाभ घ्यावा. ही रक्कम भरणा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटव्दारे ऑनलाईट पेमेंट करता येणे सहजशक्य असून त्याकरिता महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयाला भेट देण्याची आवश्यकता नाही. विविध करांच्या स्वरूपात मिळणा-या महसुलातूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता केली जात असल्याने अभय योजनेचा आजच लाभ घेऊन दंडात्मक रक्कमेवर 75% सूट मिळवावी आणि नवी मुंबईच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 02-03-2021 14:32:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update