स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वाशी, तुर्भे विभागाला आयुक्तांची आकस्मिक भेट
देशातील स्वच्छ शहरांमध्ये सर्वोत्तम क्रमांकाचे मानांकन मिळविण्याचा ध्यास घेऊन नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असताना स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरातील स्वच्छता स्थितीचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणीव्दारे आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. वाशी आणि तुर्भे विभागातील विविध ठिकाणांना आकस्मिक भेट देत त्यांनी बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते.
वाशी विभागातील नागरिकांचे आकर्षण स्थान असलेल्या तसेच सकाळ आणि संध्याकाळी जॉगींगसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असलेल्या जुहूगांव चौपाटी अर्थात मिनी सी शोअर येथील स्वच्छता व सुशोभिकरण कामांची त्यांनी पाहणी केली. पुढे जूहूगांव स्मशानभूमी, सेक्टर 29 उद्यान, सेक्टर 17 महाराजा मार्केट, सेक्टर 6 जागृतेश्वर तलाव, वाशीगांव परिसर, वाशी रेल्वेस्टेशन परिसर, सायन पनवेल हायवे वाशी उड्डाणपुल परिसर, सेक्टर 14 वाशी अशा वाशी विभागातील अंतर्गत साफसफाईची पाहणी करताना आयुक्तांनी तलाव स्वच्छता, मार्केट परिसर स्वच्छता, महामार्गालगतची स्वच्छता, स्वच्छता गृहांची स्वच्छता, नाल्यांची स्वच्छता, कंपोस्ट पिट्सची कार्यवाही अशा वेगवेगळ्या बाबींची बारकाईने पहाणी केली.
शहरातील बहुतांशी नाल्यांच्या कडेला कुणी प्रवाहात कचरा टाकू नये म्हणून जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत, तसेच प्रवाहातील कचरा अडून रहावा व साफ करता यावा याकरिता नाल्यांच्या प्रवाहामध्ये जंक्शनच्या ठिकाणी नेट्स लावलेल्या आहेत. अशा जाळ्यांची व नेट्सची ठिकठिकाणी पाहणी करीत आयुक्तांनी तेथे नियमित साफसफाई केली जाईल याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. अशाचप्रकारे तलावांच्या जलाशयावरही पाणवनस्पती व कचरा राहू नये याची खबरदारी घेत दिवसातून दोन वेळा जलाशयांची सफाई केली जाईल याकडे काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्याकडे ओला व सुका कच-यासाठी हिरवा व निळा डबा असलाच पाहिजे असे निर्देशित करीत मार्केट जवळील कंपोस्ट पिट्स व्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असताच कामा नयेत असा कडक इशारा आयुक्तांनी दिला.
अशाचप्रकारे सेक्टर 21, 22 व तुर्भेगांव परिसरातील स्वच्छतेची पाहणी आयुक्तांनी संपूर्ण परिसरात फिरून केली. गाव, गावठाण परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देतानाच कोव्हीड सुरक्षा नियमांचेही नागरिकांकडून पालन होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. तुर्भेगांव तलावातील स्वच्छतेबाबत अधिक दक्ष राहून जलाशय स्वच्छतेची कार्यवाही करावी असे आदेशित करतानाच आयुक्तांनी गाव आणि झोपडपट्टी परिसरातील घरांमधून ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जावा व महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींकडे तो वेगवेगळा दिला जावा यादृष्टीने अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नियमित स्वच्छता व शहर सुशोभिकरणाच्या माध्यमातून शहराचे रूप बदलत असल्याचे अभिप्राय नवी मुंबईकर नागरिक तसेच शहराला भेटी देणारे इतर शहरातील मान्यवर व नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असताना प्रत्येक नागरिकाने शहर अस्वच्छ होणार नाही याची खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे. नवी मुंबई शहर देशात नंबर वन येण्यासाठी माझा कचरा ही माझी जबाबदारी हे लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचराच होऊ दिला नाही व कचरा टाकत असलेल्यांनाही एक स्वच्छताप्रेमी जबाबदार नागरिक म्हणून कचरा न टाकण्याचे आवाहन केले तर नवी मुंबई देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचे निश्चितच मानकरी ठरेल. त्यामुळे नागरिकांनी आपल्या नवी मुंबई शहराला देशात नंबर वन प्राप्त करून देण्यासाठी सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-03-2021 14:10:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update