नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25 हजाराहून अधिक नागरिकांना कोव्हीड 19 लसीकरण, नवी मुंबईतील 7 खाजगी रुग्णालयातही लसीकरणाला प्रारंभ

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड 19 लसीकरणाला सुरुवात झाली असून 1 मार्चपासून शासन निर्देशानुसार तिस-या टप्प्यामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी (को-मॉर्बेडिटी) असणारे 45 पेक्षा जास्त वयाचे नागरिक यांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. तीन दिवसांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली रुग्णालयांमध्ये 528 ज्येष्ठ नागरिक व 45 पेक्षा जास्त वयाचे को-मॉर्बीड नागरिक यांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
*या 3 महापालिका रूग्णालयांमध्ये आता आणखी 7 खाजगी रुग्णालयांची वाढ झालेली असून आजपासून एकूण 10 रूग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील को-मॉर्बीड नागरिक यांच्या लसीकरणास सुरवात झालेली आहे. या खाजगी रूग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या - (1) डिव्हाईन हॉस्पिटल, घणसोली, (2) महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट (MPCT) हॉस्पिटल, सानपाडा, (3) आर.एन.पाटील सुरज हॉस्पिटल, सानपाडा, (4) आचार्य श्री नानेश हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर, (5) मंगलप्रभु हॉस्पिटल, जुईनगर, (6) डि.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ, (7) सुयश हॉस्पिटल नेरुळ अशा 7 रुग्णालयांचा समावेश आहे.*
ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच 45 वर्षाहून अधिक वयाच्या सहव्याधी असणा-या नागरिकांनाही लसीकरण सुरु झाले असून कोमॉर्बिड नागरिकांनी लस घेण्याकरिता वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विशिष्ट नमुन्यामध्ये प्रमाणपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे. सदर प्रमाणपत्राचा नमुना भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या www.mohfw.gov.in या वेबसाईटवर Guidline Note for CO-WIN 2.0 या सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.
केंद्र सरकारमार्फत सहव्याधी (को-मॉर्बेडिटी) निश्चित करण्यात आल्या असून यामध्ये पल्मनरी आर्टरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट (Pulmonary Artery Hypertension and Hypertension / Diabetes on treatment), अंजायना आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट (Angina and Hypertension / Diabetes on treatment) अशा व इतर आजारांचा समावेश आहे.
लस घेण्याकरिता तिस-या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी अधिकृत कोविन ॲपवर असणे गरजेचे असून त्याकरिता 2 पर्याय आहेत. (1) ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर cowin.gov.in या वेबसाईटवर भरून त्यावरून येणा-या ओटीपी नुसार स्वत:ची नोंदणी करून घेऊ शकतात. यामध्ये लसीकरण सत्राची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकतात.
त्याचप्रमाणे (2) रिझव्हर्ड स्लॉटमध्ये ज्या लाभार्थ्यांना स्वत:हून नोंदणी करणे शक्य होत नाही असे लाभार्थी बुथवर स्वत: जाऊन आपली नोंदणी करून घेऊन लस घेऊ शकतात.
शासन निर्देशानुसार 16 जानेवारीपासून कोव्हीड 19 लसीकरणास डॉक्टर व इतर आरोग्यकर्मी कोरोना योध्यांपासून सुरुवात करण्यात आली असून दुस-या टप्प्यात पोलीस, सुरक्षा व पहिल्या फळीतील इतर कोरोना योध्यांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीचा दुसरा डोसही देण्यास सुरुवात झालेली आहे.
तिस-या टप्प्यातील लसीकरणामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी (को - मॉर्बेडिटी) असणारे 45 ते 59 वर्ष वयाचे नागरिक यांच्या लसीकरणाकरिता आता तीन महानगरपालिकेची व 7 खाजगी रुग्णालये उपलब्ध झालेली आहेत.
प्रत्येक लाभार्थ्याने दोन डोस घ्यावयाचे असून पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस ते 42 दिवस या अंतराने दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. 42 दिवसांनंतर पोर्टलमार्फत दुसरा डोस घेता येत नाही याचीही नोंद घ्यावयाची आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक डोस मोफत देण्यात येत असून 7 खाजगी रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी प्रति लाभार्थी रुपये 250/- प्रति डोस शुल्क शासकीय निर्देशानुसार आकारण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरु झाल्यापासून 25 हजारहून अधिक कोरोना योध्दे व नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपली लसीकरणाची वेळ येईल तेव्हा प्रत्येक नागरिकाने कोव्हीडपासून सुरक्षा देणारे कोव्हीड 19 लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 04-03-2021 15:19:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update