प्लास्टिक प्रतिबंधात्मक विशेष मोहीमेत 2.40 लक्ष दंडवसूली व 902 किलो प्लास्टिक जप्त
पर्यावरणाला व मानवासह इतर जैवसृष्टीला घातक असणा-या प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा व त्यातही प्लास्टिक पिशव्यांचा नवी मुंबई शहरात वापर होताच कामा नये याबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी गांभीर्याने लक्ष दिले असून विभाग कार्यालयांच्या सहा. आयुक्तांवर याबाबतची जबाबदारी सोपविलेली आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांत सर्वच विभाग कार्यालय हद्दीत प्लास्टिक विरोधी कारवायांना वेग आला आहे.
*विभाग पातळीवरील कारवायांप्रमाणेच मुख्यालय पातळीवरूनही याकडे बारकाईने लक्ष ठेवले गेले पाहीजे असे निर्देश आयुक्तांनी दिलेले असून त्यास अनुसरून आज घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे यांनी वाशी, सानपाडा व कोपरखैरणे भागातील दुकानांमध्ये धडक देत 46 दुकानदारांकडून 2 लक्ष 40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली तसेच 902 किलो प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. प्रल्हाद खोसे व स्वच्छता अधिकारी श्री. दिनेश वाघुळदे उपस्थित होते.*
सकाळी 8 पासून कारवाईला सुरूवात करीत वाशी विभागातील सेक्टर 9 बसडेपो जवळील मार्केट व सेक्टर 9 चे मिनी मार्केट याठिकाणी 12 दुकानांवर कारवाई करीत 70 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच सानपाडा क्षेत्रातील सेक्टर 16, सेक्टर 3 व सेक्टर 5 येथील 20 दुकानदारांकडून 1 लक्ष रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे संध्याकाळी 4 पासून कोपरखैरणे विभागात कारवाई करीत 14 दुकानदरांकडून 70 हजार इतकी दंडात्मक वसूली करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल 902 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
प्लास्टिक आपल्यासाठी घातक असून त्याचा वापर करू नये असे महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत आहे. त्यामध्ये नियम मोडून प्लास्टिकचा वापर करणा-यांविरोधात महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जात असली तरी दंड वसूल करणे हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट नाही, तर प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णत: थांबविणे हे ध्येय आहे. त्यामुळे आपले नवी मुंबई शहर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मी प्लास्टिकचा वापर करणार नाही असा निश्चय करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 06-03-2021 16:49:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update