घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी






स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनातील कच-याची योग्य रितीने विल्हेवाट हा अतिशय महत्वाचा घटक असून त्याकडेही बारकाईने लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील शास्त्रोक्त लँडफील पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता श्री. मनोज पाटील उपस्थित होते.
महानगरपालिकेचा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा देशातील एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणून सुरूवातीपासूनच नावाजला जात असून अनेक देशी, परदेशी पर्यावरण तज्ज्ञांनी त्याला भेट देत प्रशंसा केलेली आहे. या प्रकल्पस्थळी दररोज 750 मेट्रिक टनाहून अधिक ओला व सुका कचरा शहरातील विविध ठिकाणांहून आणला जातो व त्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाते.
या प्रकल्प स्थळावरील पाच सेल क्षमता संपुष्टात आल्याने शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्यात आले असून सध्या सहाव्या सेलची क्षमता संपुष्टात येत असल्याने सातवा सेल तयार करण्यात आलेला आहे. आयुक्तांनी या सर्व सेलची पाहणी करीत तांत्रिकदृष्टया माहिती जाणून घेतली व महत्वाच्या सूचना केल्या.
प्रकल्पस्थळी ओल्या कच-यापासून साधारणत: 32 ते 35 मेट्रिक टन सेंद्रीय खत तयार होत असून त्याचा उपयोग उद्यानांचे शहर म्हणून नावलौकिक असणा-या महापालिका क्षेत्रातील उद्याने, बागा, पार्क फुलविण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे यामधील 18 ते 20 मेट्रिक टन प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाते. यामधून प्लास्टिक ग्रॅन्युल्स बनवून डांबरी रस्ते तयार करताना त्यावर कोटींग म्हणून उपयोग केला जातो. यामुळे रस्त्यांमध्ये पाणी झिरपत नाही आणि डांबरी रस्त्यांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. घनकच-यातील द्रव लिचेटवर प्रक्रिया करून त्याचा उपयोग प्रकल्पस्थळावरील हरितपट्टा आणि उद्यानासाठी केला जातो.
याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकाम कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी 20 मेट्रिक टन प्रति तास क्षमतेचा सी अँड डी प्रक्रिया प्रकल्प त्याठिकाणी कार्यान्वित आहे. यामध्ये बांधकाम व पाडकाम कच-यावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेली खडी व रेती महानगरपालिकेच्या वतीन रस्ते, गटारे, पदपथ यांच्या बांधकामात वापरण्यात येते. त्याचप्रमाणे स्लजपासून पेव्हर ब्लॉक स्वरूपातील विटा तयार करण्यात येत असून त्याचाही उपयोग बांधकामाप्रसंगी होतो.
या प्रकल्पस्थळावरील सर्व यंत्रणेची त्या त्या जागी जाऊन पाहणी करीत आयुक्तांनी त्याठिकाणची स्वच्छता अधिक वाढविण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे भविष्यातील प्रकल्पस्थळाच्या नियोजनाविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील यांना दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कच-याचे संकलन, वाहतुक आणि शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट याची प्रणाली व्यवस्थित राबविली जात असली तरी त्यामध्ये अधिक सुधारणा करणेबाबत जागरूकतेने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
त्याचप्रमाणे नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खत टोपलीसारख्या उपयोगी गोष्टीचा वापर करून घरातील ओल्या कच-याची घरातच विल्हेवाट लावली तर त्यांना कुंडीतील झाडे फुलविण्यासाठी सेंद्रीय खतही मिळेल तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळ मिळून देशात पहिल्या नंबरचे शहर म्हणून आपण केलेला निश्चय पूर्ण होईल असा विश्वस व्यक्त करीत समस्त नवी मुंबईकर नागरिकांनी माझा कचरा ही माझी जबाबदारी मानत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत मौलिक योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 06-03-2021 17:07:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update