जागतिक महिला दिनी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले महिला प्रेरणा गीताचे लोकार्पण डॉ. नंदिता पालशेतकर यांनी साधला वंध्यत्व व आयव्हीएफ तंत्रज्ञाविषयी ऑनलाईन संवाद
मानवजातीचा इतिहास पाहिला तर महिलांनी सर्वच क्षेत्रात अव्दितीय कामगिरी बजावलेली दिसते. महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष महिला प्रेरणा गीत तयार केले असून त्याचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले आणि हे प्रेरणा गीत विविध समाज माध्यमांतून प्रसारित करण्यात आले.
' तू चाल अशी जरा- वाट तुझी ही सांगते
तू झेप घे जरा - नभ तुज हे खुणावते
घे भरारी उंच तू - तुझेच सारे हे ऋतू '
अशा अनुष्का चढ्ढा यांच्या सुरेख शब्दसूरांनी सजलेले हे गीत जयदीप बागवाडकर यांच्या सुरेल आवाजात हे गीत हृदयाला भिडते. समाज माध्यमांवरून जागतिक महिला दिनी हजारो रसिकांची पसंती या महिला प्रेरणा गीताला लाभली. विशेष म्हणजे त्यामध्ये पुरूषांचीही संख्या लक्षणीय आहे.
याशिवाय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने सप्ताहभर विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून सध्याचा कोव्हीडचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर व्याख्याने ऑनलाईन फेसबुक लाईव्हव्दारे प्रसारित होत आहेत.
या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प जागतिक महिला दिनी 'स्त्रियांमधील संप्रेरके व मानसिक स्थिती आणि व्यंध्यत्व व आयव्हीएफ तंत्रज्ञान' या विषयावर डॉ. नंदिता पालशेतकर यांनी साकारले. यामध्ये त्यांनी वंध्यत्व हा काही आजार नाही असे स्पष्ट करीत लोक काय म्हणतील या भीतीने याबद्दल उघड बोलले जात नाही. ही स्थिती आता 21 व्या शतकात तरी बदलण्याची गरज असल्याचे मत मांडले. आयव्ही एफ तंत्रज्ञानाव्दारे अनेक स्त्रियांच्या मनातली आई बनण्याची इच्छा पूर्ण करता आली याचे समाधान वाटत असल्याचे सांगत हे तंत्रज्ञान स्त्री सक्षमीकरणासाठी वापरता येत असल्याचा अभिमान वाटतो अशी भावना व्यक्त केली. या सुसंवादात त्यांनी महिलांमधील संप्रेरके व बदलणारी मानसिक स्थिती याविषयी अभ्यासपूर्ण भाष्य केले तसेच आयव्हीएफ तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली.
9 मार्चला सायं. 6 वा. आयुर्वेदाचार्य डॉ. मालविका तांबे या 'सुजाण पालकत्व' या विषयावर ऑनलाईन संवाद साधत असून 10 मार्चला सायं. 5.30 वा. मानवाधिकार आयोग, महा. राज्य यांच्या महासचिव श्रीम. चैत्राली वांकर 'महिला सबलीकरण' या विषयावर फेसबुक लाईव्हव्दारे हितगुज करणार आहेत. अशाप्रकारे संपूर्ण आठवडाभर विविध विषयांवर व्याख्याने संपन्न होणार आहेत
याशिवाय 18 वर्षावरील महिलांकरीता 7 ऑनलाईन स्पर्धा - (1) बेस्ट ऑफ वेस्ट – टाकाऊपासून टिकाऊ (पर्यावरणपूरक वस्तू) - घरातील टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणपूरक वस्तू बनवणे स्पर्धा, (2) किचन / टेरेस गार्डनींग - घरातील किचन, बाल्कनी किवा गच्चीवर विकसित केलेली बागकाम स्पर्धा, (3) स्त्रीशक्तीवर आधारित जनजागृतीपर चारोळी किंवा कविता स्पर्धा, (4) क्रिएटिव्ह रांगोळी स्पर्धा, (5) नवी मुंबई हास्यसम्राज्ञी विनोदी अभिनय स्पर्धा, (6) सलाड सजावट स्पर्धा, (7) एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमधील सहभागाकरिता नोंदणी करण्याची लिंक दि. 11 मार्च 2021 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत खुल्या असणार असून स्पर्धा सहभागकरिता अर्ज, नियम, अटी व शर्ती याची सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे फेसबुक पेज @NMMConline यावर उपलब्ध आहे. स्पर्धकांनी व्हॉट्स ॲप क्रमांक 9833540864 यावर त्यांची स्पर्धेकरिता तयार केलेली व्हिडीओ क्लिप / फोटो पाठवावयाचा आहे. या स्पर्धांमध्ये दिघा ते सीबीडी बेलापूर या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिला सहभाग घेऊ शकतात, याची स्पर्धकांनी नोंद घ्यावयाची आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच 15 मार्चपर्यंत दररोज फेसबुक लाईव्हव्दारे महिलांशी निगडीत विविध विषयांवरील व्याख्यानांचा अनुभव घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-03-2021 13:00:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update