आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली ऐरोलीतील स्वच्छतेची पाहणी

मागील वर्षीचा स्वच्छ सर्वेक्षणातील देशातील तिसरा नंबर यावर्षी उंचावत पहिल्या नंबरवर नेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली असून अंतिम टप्प्यातील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध भागांना भेटी देत करीत आहेत.
काल घणसोली विभागाची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी ऐरोली विभागात सेक्टर 8 ए, 8 बी, सेक्टर 9, सेक्टर 10, दिवागांव, सेक्टर 15, सेक्टर 14, सेक्टर 16, सेक्टर 17, सेक्टर 4, सेक्टर 3, सेक्टर 19, सेक्टर 20, पटनी रोड, ऐरोलीगांव, साईनाथ वाडी, देशमुख वाडी, समता नगर, सेक्टर 1, सेक्टर 2, चिंचपाडा, गणेश नगर, यादव नगर अशा विविध भागांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीमध्ये सर्व भागांमध्ये स्वच्छता सुरु असल्याचे निदर्शनास आले तरी वर्दळीच्या ठिकाणी दिवसातून दोन वेळा सफाई केली जात असल्याने तेथे रात्रीची सफाई केली जात असल्याची खात्री करून घ्यावी व ती नियमित राहील याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश आयुक्तांनी उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांचेमार्फत सर्व विभाग अधिका-यांना दिले.
ज्या ठिकाणी रस्ते, पदपथ व इतर बांधकामे सुरु आहेत अशा ठिकाणी ठेवलेले बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडू न देता ते व्यवस्थितरित्या ठेवले जावे असे निर्देश त्यांनी दिले. तसेच नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊन नाले अस्वच्छ होऊ नये म्हणून बसविण्यात येत असलेल्या संरक्षक जाळ्या सेक्टर 8 बी व सेक्टर 15 येथील नाल्यांवरही बसवाव्यात असे त्यांनी पाहणी करताना सूचित केले. तसेच महत्वाचे म्हणजे नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा न टाकता शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यानिमित्त नागरिकांना केले.
विशेषत्वाने चिंचपाडा व यादवनगर भागातील नाल्यांची पुन्हा सफाई करून घ्यावी तसेच त्यामध्ये नागरिकांकडून कचरा टाकला जाऊ नये याकरिता लक्ष ठेवण्यात यावे असे निर्देश देताना याकामी स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य घ्यावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचीही त्यांनी पाहणी केली. विविध भागांना भेटी देत असताना ब-याच ठिकाणी बांधकाम व पाडकामाचे डेब्रीज रस्त्यांच्या कडेला दिसून येत असून सदर डेब्रीज हे महानगरपालिकेच्या तुर्भे येथील सी ॲण्ड वेस्ट प्रकल्पस्थळी पुढील प्रक्रियेसाठी नेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेमध्ये देशात अग्रेसर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे असून 'निश्चय केला - नंबर पहिला' हे ध्येय साध्य करण्यासाठी नागरिकांनी स्वत: स्वच्छतेत योगदान द्यावेच याशिवाय कुणी अस्वच्छता करताना दिसल्यास त्याचेही प्रबोधन करून शहर स्वच्छतेत सामुहिक सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 10-03-2021 14:10:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update