प्लास्टिक प्रतिबंधात्मक सर्वात मोठी धडक कारवाई एपीएमसी मार्केटमध्ये 2 हजार किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर नवी मुंबईत पूर्णपणे थांबला पाहिजे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागांमध्ये धडक कारवाई करण्यात येत असून प्लास्टिक पिशव्या देणारे विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे.
आज कोपरखैरणे विभागात स्वच्छतेविषयक पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि सहा. आयुक्त तथा कोपरखैरणे विभाग अधिकारी श्री. अशोक मढवी यांना एका फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी आढळली. त्यावर कारवाई करीत त्यांनी फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी कुठून आली याचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. कोपरखैरणे मधील ज्या दुकानदाराकडून त्या फेरीवाल्याने प्लास्टिक पिशव्या घेतल्या, त्या दुकानाला त्रयस्थ व्यक्ती म्हणून या अधिका-यांनी भेट दिली व प्लास्टिक पिशव्या हव्या आहेत अशी मागणी केली. त्याने त्या दिल्यानंतर कारवाई करीत त्याने कोणाकडून प्लास्टिक पिशव्या खरेदी केल्या याची माहिती घेतली आणि असा मागोवा घेत अखेरीस सेक्टर 19 ए तुर्भे येथील एपीएमसी मार्केट मधील एल.एन.ट्रेडींग कंपनीच्या दुकानात व गाळ्यात साधारणत: 2 हजारहून अधिक किलोचा प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा हाती लागला. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साठा पकडण्याची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
सदर साठा महानगरपालिकेने ताब्यात घेतला असून संबंधितांकडून 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. याशिवाय एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, नगररचनाकार श्री. केशव शिंदे, विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी व श्री. सुबोध ठाणेकर, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, स्वच्छता अधिकारी श्री.सुधाकर वडजे आणि इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी होते.
Published on : 11-03-2021 12:00:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update