*दिघा विभागात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा स्वच्छता पाहणी दौरा*




स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर अनपेक्षितपणे विविध विभागांना भेटी देत असून स्वच्छतेची प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी करीत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ते भेटी देत असल्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारीही अधिक सतर्क झाले असून यामुळे स्वच्छता कार्याला गती आलेली आहे.
आजही *आयुक्तांनी सकाळी 7.30 वाजल्यापासून दिघा विभागाला भेट देत दिघागांव, नामदेव नगर, बिंदुमाधवनगर, कृष्णावाडी, गणेशनगर, दुर्गानगर, रामनगर भागांना भेटी देत तेथील स्वच्छता कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रशासन व परिमंडळ उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार होते.
दिघा विभागात सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याठिकाणी नियमित स्वच्छता राखली जाईल याची काळजी घेतली जावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. शौचालय किती वेळा साफ केले जाते या संख्येपेक्षा ते नियमित साफ राहील याची दक्षता घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले.
दिघा विभागातील नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा टाकला जातो, यावर निर्बंध घालून नाले स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांची रहदारी असते अशा बाजूने नाल्यांच्या काठावर बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांची संख्या वाढवावी व नाल्यांच्या प्रवाहात कचरा अडून राहून तो साफ करणे सोपे जावे याकरिता स्क्रीन बसविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
बिंदुमाधव नगर येथे स्त्री मुक्ती संघटनेच्या सहयोगाने चालविल्या जाणा-या महिला स्वच्छता दूतांमार्फत वस्तीतील कचरा संकलन करून त्यातील ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्याच्या प्रकल्पालाही आयुक्तांनी भेट देऊन महत्वाच्या सूचना केल्या.
रामनगर भागात ओला व सुका कचरा घराघरातूनच वेगळा केला जातो या कामाची प्रशंसा करीत त्यांचे अनुकरण सर्वांनी करावे असे आवाहनही आयुक्तांनी केले. ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधत त्यांचीही मते आयुक्तांनी जाणून घेतली.
अशाप्रकारे *विविध विभागांमधील स्वच्छता कार्याची सकाळी लवकर अनपेक्षित भेट देत पाहणी करून आयुक्त दररोज सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे सर्व विभाग अधिकारी व विभागांचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद साधत असून त्यामध्ये पाहणीमध्ये आढळलेल्या बाबींविषयी चर्चा करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवित आहेत.*
*नवी मुंबई यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात पहिल्या नंबरचा निर्धार करून सहभागी झालेली असताना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या अचानक पाहणी दौ-यांमुळे स्वच्छता कामांत सातत्य राखले जाऊन त्याला गती लाभत आहे.*
Published on : 11-03-2021 15:19:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update