*मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करण्याचे आयुक्तांचे निर्देश*

अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर नागरिकांना 15 मार्चपर्यंत 75% सूट मिळणार असून आता काहीच दिवस शिल्लक राहिल्याने थकबाकीदार नागरिकांपर्यंत पुन्हा प्रभावीपणे या संधीचा लाभ घेण्याविषयी विविध माध्यमांतून प्रसिध्दीव्दारे माहिती पोहचवावी असे सूचित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सन 2020-21 करिता मालमत्ताकर वसूलीचे उद्दिष्ट 625 कोटी आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने 31 मार्चपर्यंत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक गांभीर्याने काम करावे असे मालमत्ताकर विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी निर्देशित केले.
आगामी 2021-22 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सन 2020-21 करिता मालमत्ता कर विभागाकरिता 600 कोटी जमा होतील असे सुधारित उद्दिष्ट आयुक्तांनी जाहीर केले होते. सद्यस्थितीत यावर्षी 452.35 कोटी इतकी रक्कम मालमत्ताकरापोटी जमा झाली असून यापुढील 20 दिवसात अधिक प्रभावी काम करण्याची गरज विषद करीत आयुक्तांनी 625 कोटी वसूलीचे उद्दिष्ट दिले आहे.
त्यास अनुसरून आयुक्तांच्या निर्देशानुसार ॲक्शन प्लान तयार करण्यात आला असून मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी आठही विभागांकरिता उद्दिष्ट्ये ठरवून दिलेली आहेत. यामध्ये थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने विभागनिहाय यादी तयार करण्यात आली असून या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
15 मार्चपर्यंत दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सूट व त्यानंतर 31 मार्चपर्यंत सूट कमी होऊन 50 टक्के होणार असल्याने या संधीचा लाभ जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घ्यावा यासाठी ठोस प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांस दिल्या. लघुउद्योजकांनीही त्यांची मूळ मालमत्ताकर रक्कम भरावी याकरिता कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असून त्याचा भरणा करणे हे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. त्यामुळे मालमत्ताकर विभागाने पूर्ण क्षमतेने नियोजनबध्द काम करावे असे आयुक्तांनी सांगितले.
अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% सूट मिळण्यास काही दिवस उरले असून 16 मार्चनंतर 31 मार्चपर्यंत 50 टक्के सूट मिळणार असल्याने थकबाकीदार नागरिकांनी 75 % सूटीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी त्वरा करावी तसेच सन 2020-21 मधील दुस-या सहामाहीची मालमत्ताकर देयक रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आलेली असल्याने नागरिकांनी या आर्थिक वर्षातील दुस-या सहामाहीची देयक रक्कमही लवकरात लवकर भरणा करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-03-2021 10:43:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update