*केंद्रीय सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा यांनी केली '21 डेज् चॅलेंज' या अभिनव उपक्रमाची प्रशंसा*
नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या 21 डेज् चॅलेंज या उपक्रमाची संकल्पनाच अतिशय वेगळी असून यामुळे नागरिकांच्या मनात मोठे परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त करीत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात नंबर वन येण्यासाठी केलेल्या निश्चयाला शुभेच्छा दिल्या.
स्वच्छता सवयीचे 21 दिवस अर्थात #21DAYSCHALLENGE उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभानिमित्त आयोजित "एसएस 2021 म्युझिकल नाईट" या व्हर्च्युअल इव्हेन्टमध्ये केंद्रीय सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा यांनी ऑनलाईन सहभागी होत मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 21 डेज् चॅलेंज या उपक्रमाविषयी माहिती दिल्यानंतर केंद्रीय सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा यांनी नवी मुंबई हे देशातील एक नामांकीत शहर असल्याचे सांगत मागील वर्षी देशातील 4242 शहरांमधून नवी मुंबई शहर तिस-या क्रमांकावर आले ही मोठी उपलब्धी असल्याचे मत व्यक्त केले. यावर्षी देशात पहिल्या क्रमांकाचा निर्धार करून तयारी केलेली असताना अंतिम टप्प्यातील स्पर्धा काहीशी कठीण असली तरी या माध्यमातून शहरात उभी राहणारी स्वच्छतेची चळवळ महत्वाची असल्याचे अधोरेखित करीत त्यांनी नवी मुंबईच्या पहिल्या नंबरच्या निश्चयाला शुभेच्छा दिल्या.
अभियानाच्या निकषांमध्ये दरवर्षी सुधारणा घडवित असल्याचे सांगतानाच समाजातील सर्व घटकांना जोडणा-या या स्वच्छता अभियानामुळे देशातील शहरांमध्ये निकोप स्पर्धा होऊन लोकसहभागातून एक चळवळ उभी राहिल्याचे मत केंद्रीय सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुप्रसिध्द गायक श्री. शंकर महादेवन यांनी मागील 25 वर्षांपासून मी नवी मुंबईकर असून त्याचा मला अभिमान असल्याचे सांगत नवी मुंबईकर नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता असून त्यामुळेच येथे स्वच्छतेचे जन आंदोलन उभे राहिले असल्याचे मत व्यक्त केले. यावर्षी जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी भित्तीचित्रांच्या कल्पक आणि आकर्षक संकल्पना अनेक ठिकाणी चित्रीत केल्यामुळे शहराचे रूपच बदलून गेले असल्याचे सांगत केंद्रीय सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा यांना नवी मुंबईला भेट देण्याचे आमंत्रण दिले. यावर त्यांनीही मला नवी मुंबईत यायला आवडेल असे म्हटल्यावर आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आपले आगमन आमच्यासाठी प्रेरणादायी असेल असे सांगत त्यांना नवी मुंबई भेटीचे निमंत्रण दिले.
याप्रसंगी सुप्रसिध्द संगीतकार, गायक श्री. शंकर महादेवन व महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते 21 डेज् चॅलेंज उपक्रमातील सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या वनिता थोरात, प्रतिभा जाधव, बिन्सी त्रिभुवन, मयूरी कड, प्रथमेश उगले, सिध्दी मेटांगळे, इशा म्हात्रे, पौर्णिमा कारंडे, रूपाली गुंजाळ, जेबीज् ग्रीन थम्ब या 10 विजेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रशस्तिपत्रे प्रदान केली जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे ही पारितोषिके सीएसआर मदत निधीतून देण्यात आली आहेत.
पद्मश्री शंकर महादेवन यांनी सूर निरागस हो या गणेश वंदनेने आरंभ केलेले आपले सुरेल सादरीकरण विविध लोकप्रिय गाण्यांनी उंचावत नेले. चक् चक् चक् चकाक नवी मुंबई, चला बनवूया आज टकाटक नवी मुंबई या त्यांच्या स्वच्छताविषयक जनजागृतीपर गीताने एसएस 2021 म्युझिकल नाईटला स्वच्छ सर्वेक्षणाचा आयाम दिला. नवी मुंबई शहराविषयीच्या प्रेमाने या कार्यक्रमाचे त्यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन स्विकारले नाही.
इंडियन आयडॉल फेम प्राजक्ता शुक्रे यांनीही सुरेल सादरीकरणाने हा कार्यक्रम ऑनलाईन अनुभवणा-या जगभरातील रसिकांची मने जिकली. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारीत टाकाऊपासून बॅंडची वाद्ये निर्माण केलेल्या बँड वादकांनी उत्तम सादरीकरणासह थ्री आर चे महत्वही प्रदर्शित केले. वाळूतून चित्रे काढणारे कल्पक चित्रकार नितीश भारती यांनी स्वच्छता अभियानासह नवी मुंबईतील प्रदर्शनीय स्थळांची वाळूतून चित्रे रेखाटत वेगळ्या कलाप्रकाराचे दर्शन घडविले.
कोणतीही गोष्ट सलग 21 दिवस केली की 22 व्या दिवसापासून आपल्याला ती गोष्ट करण्याची सवय लागते या संकल्पनेवर आधारीत 21 डेज् चॅलेंज हा आगळावेगळा उपक्रम स्वच्छतेची सवय लागण्यासाठी अत्यंत उपयोगी असल्याचे मत याप्रसंगी विजेत्यांनी व्यक्त केले व केवळ या उपक्रमापुरते नाही तर केव्हाही आपण मनोमन हे चॅलेंज स्विकारून सुरूवात करू शकता असे आवाहन सर्व नवी मुंबईकर नागरिकांना केले.
कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एसएस 2021 म्युझिकल नाईट हा आगळावेगळा उपक्रम व्हर्च्युअल पध्दतीने सादर करण्यात आला ज्यामध्ये हजारो नवी मुंबईकर नागरिकच नव्हे तर जगभरातील इतरही संगीत व स्वच्छताप्रेमी नागरिक ऑनलाईन सहभागी झाले होते.
Published on : 14-03-2021 13:42:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update