*तुर्भे एम.आय.डी.सी. भागातील स्वच्छतेची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली पाहणी*
विकसित नागरी क्षेत्र, गांव-गावठाणे व झोपडपट्टी अशा तीन प्रकारच्या वसाहतींमध्ये नवी मुंबई शहर वसलेले असून सर्व भागांतील स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन व अभियांत्रिकी विभागास दिलेले आहेत. या अनुषंगाने स्वच्छता व सुशोभिकरण कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सकाळी लवकरच आयुक्त विविध विभागांना भेटी देत असून प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत.
ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र हे सुरुवातीपासूनच देशातील मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या स्वच्छतेची पाहणी करताना आयुक्तांनी आज तुर्भे विभागातील एम.आय.डी.सी. क्षेत्र तसेच तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरा नगर तसेच कॉरी परिसराचा दौरा करीत झोपडपट्ट्यांतील गल्ल्यागल्ल्यांमध्ये जाऊन अंतर्गत भागातील स्वच्छतेची पाहणी केली आणि स्वच्छतेतील सुधारणांविषयी महत्वाच्या सूचना केल्या.
शौचालय पाहणी करीत असताना प्रामुख्याने सकाळच्या वेळेत नागरिक त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे लक्षात घेऊन आतील भागातील स्वच्छता अधिक नियमित राखण्याची काळजी तेथील केअर टेकरने गांभीर्याने घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. ठिकठिकाणी नागरिकांशी स्वच्छतेविषयी संवाद साधताना आयुक्तांनी आपला परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी नागरिकांनीही घ्यावी असे आवाहन केले.
वस्तीमधील नागरिक दररोज ठराविक सार्वजनिक अथवा सामुदायिक शौचालयांचा वापर करीत असल्याने त्यांच्याकडून दररोज वापर शुल्क घेण्याऐवजी त्यांच्या कुटुंबाला मासिक पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी तत्परतेने कार्यवाही करावी असे आदेश आयुक्तांनी प्रशासन तथा परिमंडळ 1 विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांना दिले.
एम.आय.डी.सी. परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, पदपथ, गटारे, नाले यांची कामे सुरु असून त्याठिकाणी ग्रीन नेट बांधण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शहर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यवाही केली जात असून नागरिकांनी आपल्या घरात निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा व महानगरपालिकेच्या कचरा गाडीत तो वेगवेगळा द्यावा तसेच प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक यांचा वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे. महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, विविध सेवाभावी संस्था-मंडळे आणि स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक यांच्या एकत्रित व सामुहिक प्रयत्नांतून आपले नवी मुंबई शहर देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या नंबरला नेण्याचे उद्दीष्ट साध्य होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
Published on : 18-03-2021 11:37:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update