*आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या पुनर्पाहणीतून स्वच्छता कामांना वेग*





स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून त्यामध्ये सातत्य राखले जायलाच हवे या सूत्रानुसार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने सकाळी लवकरच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विभागांना भेटी देत असून अगदी गल्लीबोळात जाऊन तेथील स्वच्छता कामांची पाहणी करीत आहेत.
सुरूवातीला आठही विभागांचे क्षेत्रवार दौरे केल्यानंतर त्या पाहणीमध्ये आढळलेल्या स्वच्छताविषयक सूचनांच्या अनुषंगाने त्याबाबत करण्यात आलेल्या पूर्ततेची पुनर्तपासणी आता आयुक्त स्वत: त्या भागांना पुन्हा भेटी देत करीत आहेत. त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच संबंधित सर्व घटक स्वच्छतेविषयी अधिक सतर्क झाले आहेत.
आजही आयुक्तांनी सकाळीच बेलापूरगावापासून सुरूवात करीत सेक्टर 15, सेक्टर 11, सागरविहार परिसर, खाडीकिनारा, सेक्टर 1, सेक्टर 1 ए, मँगो गार्डन, मार्केट, सेक्टर 8, 9, संभाजीनगर, रमाबाई आंबेडकर नगर, सेक्टर 4 तसेच नेरूळ सेक्टर 23, सेक्टर 19, आर.आर.पाटील उद्यान, सेक्टर 21, स्टेट बॅक कॉलनीमधील खतप्रक्रिया प्रकल्प, सेक्टर 15, शिवाजीनगर, एम.आय.डी.सी. भाग, त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर 5, सेक्टर 14, हेगडे भवन, सेक्टर 15, सेक्टर 16, भवानी मार्केट, झेन गार्डन, सेक्टर 4, सेक्टर 3, सेक्टर 2, सेक्टर 1, समतानगर, समतानगर येथील घनकचरा प्रकल्प, ऐरोली तलाव अशा विविध ठिकाणी भेटी देत स्वच्छतेच्या अनुषंगाने पाहणी केली.
*या सर्व भागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची आयुक्तांनी स्वत: पाहणी करून स्वच्छतेबाबत खात्री करून घेतली व प्रत्येक शौचालयाठिकाणी स्वच्छतेविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी लावलेल्या क्यू आर कोड सिस्टिमचा वापर करून आपल्या मोबाईलवरून अभिप्रायही नोंदविले. सकाळच्या वेळेत सार्वजनिक शौचालयात असणारी वर्दळ लक्षात घेऊन त्याठिकाणच्या केअरटेकरने मॉप हातात घेऊन उभे राहून ते सतत स्वच्छ ठेवलेच पाहिजे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी परिमंडळ उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि श्री. अमरिश पटनिगीरे यांना दिले.*
*आपल्या नवी मुंबई शहरामध्ये देशात सर्वेात्तम स्वच्छ शहराचा बहुमान मिळविण्याची क्षमता आहे. आजवरच्या महानगरपालिकेच्या यशात नवी मुंबईकर नागरिकांच्या सहभागाचा फार मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे स्वच्छताप्रेमी म्हणून ओळखल्या जाणा-या नागरिकांच्या सहयोगाच्या बळावरच देशात पहिल्या नंहरचा निश्चय करीत महानगरपालिका प्रशासन झपाटून कामाला लागले आहे. शहर स्वचछतेवर भर देत सुशोभिकरणातून शहराचे रूप बदलले आहे. आपण देशातील एक नंबरच्या शहरात राहतो हा प्रत्येक नागरिकसाठी अभिमानाचा विषय असणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने मी सार्वजनिक ठिकाणी कचरा करणार नाही व माझ्या कच-याचे घरातच ओला-सुका वर्गीकरण करीन व महानगरपालिकेच्या कचरागाड्यांमध्येही वेगवेगळा देईन अशवा त्याही पुढे जात घरातील ओल्या कच-याचे खत टोपलीचा वापर करून घरातच योग्य रितीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वत: पार पा़डीन असा ठाम निर्धार केला तर हे शक्य आहे. म्हणूनच प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या शहराचा स्वच्छ शहर नावलौकीक मागील वर्षीच्या देशातील तिस-या नंबरवरून यावर्षी पहिल्या नंबरवर नेण्यासाठी शहर स्वच्छतेमधील आपली जबाबदारी शहराविषयीच्या प्रेमाने पार पाडावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 22-03-2021 14:39:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update