· मागील काही दिवसांपासून कोव्हीड-19 बाधित रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ लक्षात घेऊन कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा अधिक प्रभावीपणे “मिशन ब्रेक द चेन” राबविण्यात येत आहे. यादृष्टीने विविध उपाययोजना करताना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठिकाणी कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे व कोव्हीड प्रादुर्भावाला प्रतिबंध व्हावा यासाठी नवीन निर्बंध जाहीर केले आहेत.
· *शॉपींग मॉल्सच्या प्रत्येक प्रवेशव्दारावर (Entry Point) दर शुक्रवारी सायंकाळी 4.00 नंतर तसेच शनिवार आणि रविवार पूर्ण वेळ मॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येक अभ्यागताची कोव्हीड चाचणी (Rapid Antigen Test) करणे बंधनकारक असणार आहे. कोव्हीड चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल किंवा मॉलमध्ये येणाऱ्या अभ्यागताने मागील 72 तासांमधील कोव्हीड चाचणी (RT-PCR) अहवाल निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.*
· *शॉपींग मॉलमध्ये योग्य सामाजिक अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये 50,000/- इतका दंड मॉल व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व तिसऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास शॉपिंग मॉल पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.*
· *डि मार्ट, रिलायन्स फ्रेश, स्टार बाजार यांसारख्या Convenience Stores / Departmental Stores मध्ये एका वेळी किती अभ्यागत स्टोअरमध्ये उपस्थित राहू शकतील याचा आराखडा तयार करुन त्यानुसार टोकन प्रणाली सुरु करण्यात यावी.*
· *या स्टोअर्समध्ये योग्य सामाजिक अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये 50,000/- इतका दंड संबंधित स्टोअर्सच्या व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व तिसऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्टोअर पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.*
· * कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उद्यानांमधील ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहित्य हे पूर्णत: बंद राहतील व त्यांचा वापर करता येणार नाही.*
· *त्याचप्रमाणे सर्व उद्याने सकाळी 5.30 ते सकाळी 10.00 या वेळेव्यतिरिक्त इतर संपूर्ण वेळ बंद राहतील.*
· *दैनंदिन व आठवडी बाजारामध्ये मास्क, सुरक्षित अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाणे अनिवार्य आहे.*
· 10 मार्च 2021 पासून कोव्हीड बाधित रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा उद्याने अशा ठिकाणी होणारी गर्दी व नागरिकांकडून मास्क, सुरक्षित अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे रुग्णवाढीचा दर अधिक वाढू शकतो.
· त्यातही शनिवारी, रविवारी मॉलमध्ये होणारी गर्दी पहाता सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन होताना दिसून येत नाही. वास्तविकत: मॉलमध्ये शनिवार, रविवार अशा आठवड्याच्या अखेरच्या दिवशी होणारी गर्दी आठवड्यातील इतर दिवशी विखुरली जाणे अपेक्षित आहे, जेणेकरून मॉलमधील उपस्थितीचे योग्य नियोजन होऊन सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन होईल.
· त्याचप्रमाणे सार्वजनिक बगीचे, उद्याने, पार्क यामध्ये विशेषत्वाने संध्याकाळी अनेक कुटूंबे मास्कशिवाय वावरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामध्येही लहान मुलांना खेळणी, व्यायाम साहित्य यांच्या वारंवार हाताळणीमुळे कोव्हीड संसर्ग होण्याचा धोका अधिक होऊ शेकतो. त्यामुळे सदर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
· *यापेक्षा अधिक तीव्र निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत न चुकता मास्कचा वापर करावा व प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतराचे भान राखावे तसेच शक्य होईल तितक्या वेळा हात धुवावेत अथवा सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*