*राधास्वामी सत्संग आश्रम तुर्भे येथे कोव्हीड सेंटर सुरू- 152 कोरोनाबाधितांवर उपचार* *एक्पोर्ट हाऊसमधील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर जलद सुरू करण्याची तयारी* *कोव्हीड जम्बो लसीकरण केंद्र एक्पोर्ट हाऊस मधून ईएसआयएस रूग्णालयात स्थलांतरित*
10 मार्चपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत असून मागील आठवडाभरातील वाढीचा झपाटा मोठा आहे. त्यामुळे एका बाजूला कोव्हीड 19 प्रतिबंधासाठी 'मिशन ब्रेक द चेन' च्या अधिक प्रभावी अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आलेली असून दुस-या बाजूला कोरोना बाधित रूग्णांवर सुयोग्य उपचारासाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली कोव्हीड सेंटर सुरू करण्यावर भर दिला जात आहे.
याविषयी सोमवार, 22 मार्च रोजी तातडीने घेतलेल्या विशेष बैठकीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्यानंतर केवळ दोनच दिवसात 24 मार्चपासून तुर्भे, सेक्टर 24 येथे राधास्वामी सत्संग आश्रमाठिकाणचे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तेथे पहिल्याच दिवशी 24 मार्चला 152 कोरोनाबाधित व्यक्तींना उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे तुर्भे सेक्टर 19 मध्ये निर्यात भवन (एक्स्पोर्ट हाऊस) येथील तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले कोव्हीड सेंटरही कार्यान्वित करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली असून आगामी काही दिवसातच येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कोव्हीड रूग्णसेवेसाठी सज्ज राहील.
एक्पोर्ट हाऊस मधील जम्बो लसीकरण केंद्र वाशी ईएसआयएस रूग्णालयात स्थलांतरित
सध्या निर्यात भवन (एक्स्पोर्ट हाऊस) याठिकाणी जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले होते. सदर जम्बो लसीकरण केंद्र हे सेक्टर 5, वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयात स्थलांतरित करण्यात आलेले असून या ठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेत लाभार्थी नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.
साधारणत: दिवाळीनंतर कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या कमी होऊ लागली आणि महानगरपालिकेने काही कोव्हीड केंद्रे ही तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली होती. तथापि आता पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालल्याने आयुक्तांनी विद्यमान परिस्थितीचा आढावा घेत काही कोव्हीड केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. त्याकरिता आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्यकर्मी यांची करार पध्दतीवर पूर्तता केली जात आहे.
आता 24 मार्चपासून राधास्वामी सत्संग आश्रम, सेक्टर 24, तुर्भे येथील कोव्हीड केंद्र सुरू करण्यात आले असून निर्यात भवन (एक्स्पोर्ट हाऊस) येथील केंद्र लवकरच सुरू करण्यात येत आहे. या दोन्ही डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर प्रमाणेच काही तात्पुरती बंद केलेली कोव्हीड केअर सेंटर्स सुरू करण्यात येत असून यामधील काही केंद्रे महिलांसाठी राखीव असणार आहेत.
कोरोना बाधितांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्याकडे लक्ष देण्याप्रमाणेच कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असून नवी मुंबईकर नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे व घरात परत येईपर्यंत मास्कचा नियमित वापर करावा, सुरक्षित अंतर राखावे तसेच सतत हात स्वच्छ ठेवण्याची काळजी घेऊन कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-03-2021 14:13:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update