कोरोना प्रतिबंधासाठी कन्टेनमेंट झोनच्या प्रभावी अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष
कोव्हीडचा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) शासन नियमावलीनुसार योग्य प्रकारे निश्चित करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेले आहेत. याकामी त्यांना संबंधित नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य असणार आहे.
ज्या इमारतीमध्ये एक वा पाचपेक्षा कमी रूग्ण आढळतात असा फ्लॅट किंवा मजला अथवा संपूर्ण इमारत तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार प्रवेश प्रतिबंधित केली जात असून हे पहिल्या श्रेणीचे (First Category) प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे.
एखाद्या ठिकाणी बैठ्या स्वरूपातील एका शेजारी एक अशी जवळजवळ घरे असतील अशा वसाहती / वस्तीमध्ये एखादा रूग्ण आढळल्यास त्या रूग्णाच्या घराच्या दोन्ही बाजूची घरे दुस-या श्रेणीच्या प्रतिबंधित क्षेत्रात (Containment Zone) प्रवेश प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात येतात.
त्याचप्रमाणे जवळपासच्या भागात / सोसायटीमध्ये 5 पेक्षा अधिक रूग्ण सापडलेल्या तिस-या प्रकारचे प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) निश्चित करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ते क्षेत्र ये-जा करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करता येईल अशाप्रकारे बॅरेकेटींग लावून कन्टेनमेंट झोन बनविण्यात येतात.
या प्रतिबंधित क्षेत्रातील ये - जा पूर्णपणे थांबविणे कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याने विशेषत्वाने गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या दरवाज्याबाहेर विलगीकरण कालावधी नमूद केलेला फलक लावण्यात येत असून त्याची माहिती संबंधित सोसायटीच्या पदाधिका-यांनाही देण्यात येत आहे.
अशा व्यक्तींनी घराबाहेर पडणे पूर्णत: प्रतिबंधित असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कोव्हीड सुरक्षेचे नियम पाळून करणेविषयी सोसायटी / संबंधित विभाग कार्यालयामार्फत पुरवठादार जोडून देण्याची व्यवस्था केली जात आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीने त्याचे घर सोडून बाहेर यावयाचे नसून याविषयीची जबाबदारी सोसायटी पदाधिकारी यांच्यावरही देण्यात आलेली आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणा-या 4 व्यक्तींवर एफ.आय.आर.नोंदविण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या प्रकारचे 3055, दुस-या प्रकारचे 1040 व तिस-या प्रकारचा 1 अशी प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) असून त्याची संबंधित विभाग कार्यालयामार्फत नागरी आरोग्य केंद्राच्या सहयोगाने योग्य प्रकारे अंलबजावणी केली जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी महानगरपालिका संपूर्ण प्रयत्न करीत असून नागरिकांनी परिस्थितीचे भान ठेवून मास्क, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे अशा कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे भान राखणे तितकेच महत्वाचे आहे. विशेषत्वाने कोरोनाबाधित व्यक्तींनी आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे सामाजिक आरोग्याला धोका पोहचेल अशी कृती करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 04-04-2021 14:54:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update