*कोव्हीड केंद्राच्या भरतीला उत्तम प्रतिसाद*

नवी मुंबईतील कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक रुग्णालयीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्यात येत असून कोव्हीडची गती मंदावल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेली कोरोना केंद्रे तत्परतेने सुरु करण्यात येत आहेत. याकरिता आवश्यक असलेल्या डॉक्टर्स, नर्स व इतर मनुष्यबळाकडेही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत असून त्याच्या पूर्ततेसाठी नियोजनबध्द रितीने गतीमान पावले उचलण्यात आलेली आहेत.
याकरिता विविध आवश्यक पदांसाठी कंत्राटी स्वरुपात मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीस आरोग्यकर्मींचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. प्रशासन विभागामार्फत दोन ठिकाणी करण्यात आलेल्या भरतीच्या नियोजनानुसार आजच्या दिवसात महापालिका मुख्यालय तसेच विष्णुदास भावे नाट्यगृह येथे सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या सर्वांची कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करीत बैठक व्यवस्था करण्यात आली होती. आजच्या दिवसात कागदपत्र तपासणी व मुलाखतीनुसार 51 डॉक्टर्स, 143 स्टाफ नर्सेस, 42 ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि इतर पात्र आरोग्यकर्मींना कामावर रुजू होण्याची नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने पात्र उमेदवार उपलब्ध झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेस पूर्ण क्षमतेने कोव्हीड केंद्रे सुरु करणे शक्य होणार असून याव्दारे कोरोना बाधीतांना पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देता येणार आहे.
उद्याही आरोग्य विभागाकरिता प्रतिमहा ठोक मानधनावर कंत्राटी (करार) पध्दतीने पात्र व इच्छुक उमेदवार तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून घेण्याची भरती प्रक्रीया सुरुच राहणार असून जास्तीत जास्त संख्येने कोव्हीड केंद्रांसाठी आवश्यक पात्रतेचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
तरी वैद्यकशास्त्र तज्ञ (MD Medicine), मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट (Medical Microbiologist), इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist), एम.बी.बी.एस. डॉक्टर, बी.ए.एम.एस. डॉक्टर, बी.एच.एस.एस. डॉक्टर, बी.यू.एम.एस. डॉक्टर, स्टाफ नर्स (Staff Nurse), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician), कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Junior Lab Technician), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM), बेडसाईड सहाय्यक (Bedside Assistant) या पदांसाठी पात्र असणा-या उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या लिंकवर अर्ज सादर करून एस.एम.एस. प्राप्त झाल्यानंतर त्यात नमूद दिनांक व वेळेस आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 05-04-2021 15:50:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update