*कोरोना बाधितांच्या परिसराप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणीही निर्जंतुकीकरण फवारणी*
सद्यस्थितीमधील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येला प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना करताना कन्टेनमेंट झोनच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभाग अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी यांना दिले आहेत. यामध्ये एखादा कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यास त्याठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निर्देशित करीत सध्याची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन 24 तासाच्या आत त्याठिकाणी फवारणी झालीच पाहिजे अशाप्रकारे नियोजनबध्द गतीमान काम करण्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.
त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणी विहीत वेळेत निर्जंतुकीकरण फवारणी कार्यवाहीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक / सामुदायिक शौचालये याठिकाणीही निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अशा मार्केट, बाजार, बस डेपो, बस स्टॉप अशा सार्वजनिक ठिकाणीही सोडियम हायपोक्लोराईडची निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड नियंत्रणासाठी महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारे प्रयत्न केले जात असून निर्जंतुकीकरण फवारणी हा त्याचाच एक भाग आहे.
Published on : 06-04-2021 15:46:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update