*डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयातील आयसीयू बेड्स व्यवस्थापनाकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश*

नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी रुग्णालयीन सुविधांच्या वाढीकडे बारकाईने लक्ष दिले आहे. यामध्ये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेली कोव्हीड केअर सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्याप्रमाणेच नवीन ठिकाणीही कोव्हीड केअर सेंटर्स तत्परतेने सुरु केली जात आहेत. त्यासोबतच कोव्हीडची गंभीर लक्षणे असणा-या रुग्णांना आयसीयू बेड्सची कमतरता भासू नये याकरिता आयसीयू बेड्सची संख्या वाढविण्यासोबतच आयसीयू बेड्स उपलब्ध असणा-या रुग्णालयांतील व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
या अनुषंगाने *नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयसीयू बेड्स व व्हेन्टीलेटर्सची व्यवस्था करण्यात आलेल्या डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय येथील आयसीयू बेड्सच्या नियोजनाबाबत व रूग्णालयीन व्यवस्थापनाबात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिरीष पाटील तसेच तेथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.* यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाकरिता मुख्य समन्वयक असलेले एन.एम.एम.टी.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
*डॉ.डी.वाय.पाटील रूग्णालयात असलेल्या आयसीयू बेड्समध्ये वाढ करण्यासोबतच तेथील बेड्सवर गंभीर लक्षणे असणारे रूग्ण संदर्भित केले जात असल्याने गंभीर रूग्णांवरील उपचाराची प्रमाण कार्यपध्दती (SOP) प्रत्येक रूग्णाबाबत काटेकोरपणे पाळली जाईल याची काळजी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. डॉ.डी.वाय.पाटील रूग्णालयासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्त रूग्णालयीन नोडल अधिकारी फिजीशिअन डॉ. शरीफ तडवी यांच्या माध्यमातून याठिकाणचा ट्रिटमेंट प्रोटोकॉल आणि डिस्चार्ज प्रोटोकॉल यावर नियंत्रण ठेवले जात असून त्याकडी बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत आदेशित करण्यात आले.*
सद्यस्थितीत नवी मुंबईतील आयसीयू बेड्सवर उपचार घेणा-या रुग्णांचा आढावा घेतला असता त्यामध्ये 40 टक्क्याहून अधिक रुग्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील असल्याचे आढळते. नवी मुंबईत चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने इतरही शहरांमधील रुग्णांचा ओढा नवी मुंबईकडे असल्याचे दिसते. या रुग्णालयीन सुविधांकडे बारकाईने लक्ष दिले असता काही रुग्णालयांमध्ये वैद्यकीय दृष्टीने आयसीयू बेड्सवर उपचार घेण्याची आवश्यकता नसताना असे रुग्ण आयसीयू बेड्सवर उपचार घेताना आढळतात. त्यामुळे प्रत्यक्षात गरज असलेल्या रुग्णांना आयसीयू बेड्स उपलब्ध होत नाही. याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून कोव्हीडसाठी जाहीर केलेल्या रुग्णालयांमध्ये नियुक्त केलेल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयीन नोडल अधिकारी यांना या महत्वाच्या बाबीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
अशाचप्रकारे महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणा-या डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयातील आयसीयू बेड्स सुविधेतही बेड्सचे व्यवस्थापन करण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. आयसीयू बेड्सची गरज असणा-या व्यक्तीस त्यापासून वंचीत रहावे लागू नये यादृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचे सूचित करीत आयुक्तांनी प्रत्येक रुग्णाची आरोग्य स्थिती जाणून घेऊन त्याला सुयोग्य उपचार उपलब्ध होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित केले. क्लिनिकल मॅनेजमेंट प्रमाणेच आयसीयू बेड्सवर उपचार घेणा-या रुग्णांच्या टर्न अराऊंड टाईमचा अभ्यास करून ड्रिटमेट प्रोटोकॉल प्रमाणेच डिस्चार्ज प्रोटोकॉल व्यवस्थितरित्या सांभाळला जावा असेही त्यांनी निर्देशित केले. *रुग्णालयीन व्यवस्थापनाप्रमाणेच रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थापनही (Clinical Management) तितकेच महत्वाचे असून त्याकडे नियमित लक्ष ठेवत सौम्य, मध्यम व गंभीर स्वरुपांच्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना त्यांच्या लक्षणांनुसार रुग्णालयीन बेड्स उपलब्ध होण्याकडे रुग्णालयनिहाय नेमलेल्या नोडल अधिका-यांनी बारकाईने लक्ष देण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.*
Published on : 08-04-2021 10:56:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update