*लॉर्ड्स हॉस्टेल व सिडको सेंटर याठिकाणी एकूण 490 कोव्हीड केअर बेड्सची 2 नवीन सेंटर्स सुरू*
10 मार्चनंतर कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार 'मिशन ब्रेक द चेन' च्या अधिक प्रभावी अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्ये महत्वाचा भाग असलेल्या रूग्णालयीन सुविधा वाढीकडे विशेष लक्ष दिले जात असून कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्णांना त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने रूग्णालयीन सुविधांमध्ये तत्परतेने वाढ करण्यात येत आहे.
याकरिता कोव्हीडचा प्रसार कमी होऊ लागल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली कोव्हीड केअर सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून त्या सोबतच काही नवीन ठिकाणीही कोव्हीड सेंटर्स निर्माण करण्यात येत आहेत.
यादृष्टीने खारघर सेक्टर 19 येथील लॉर्ड्स अँड मेलबोर्न हॉस्टेल येथे 240 बेड्स क्षमतेचे कोव्हीड केअर सेंटर आजपासून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सिडको एक्झिबिशन सेंटर सेक्टर 30 वाशी येथील 1200 बेड्स क्षमतेच्या कोव्हीड सेंटरच्या बाजूलाच 250 बेड्स क्षमतेचे 'कोव्हीड केअर सेंटर 2' कार्यान्वित करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे एकूण 490 केव्हिड केअर बेड्सची दोन नवीन सेंटर्स सुरू करण्यात आलेली असून या दोन्ही सेंटरवर आजपासून रूग्ण दाखल करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.
याव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या वाशी, घणसोली व ऐरोली विभागातील शाळांमध्येही कोव्हीड सेटर्स सुरू करण्याच्या दृष्टीने फर्निचर व इतर कामे गतीने सुरू असून काही इतर ठिकाणीही कोव्हीड सेंटर्स उभारली जात आहेत.
नवी मुंबईकर महानगरपालिका कोव्हीड बाधितांवरील उपचारांसाठी आवश्यक उपायोजना वाढवित असून नवी मुंबईकर नागरिकांनी कोव्हीडचा संसर्गच होऊ न देण्यासाठी प्रत्येक क्षणी खबरदारी घ्यावी व मास्क, सुरक्षित अंतर व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-04-2021 08:50:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update