कन्टेनमेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी हा कोव्हीड प्रसार रोखण्यातील महत्वाचा घटक असून सोसायटीमधील कन्टेनमेंट झोनचे पालन करण्याची जबाबदारी सोसायटी पदाधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास सोसायटीला दंड आकारण्यात येत असून अशाप्रकारे मायक्रो कन्टेनमेंट झोनमध्ये असतानाही नागरिकांची आतबाहेर ये-जा सुरू असल्याने कोपरखैरणे सेक्टर 11 मधील बालाजी गार्डन सोसायटीकडून रू. 10 हजार इतक्या दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे घणसोली विभागातील सेक्टर 6 मधील साईनाथ गॅलक्सी या मायक्रो कन्टेनमेंट झोनमधील सोसायटीकडूनही 10 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
कोरोना संक्रमणाची साखळी खंडीत करण्यासाठी कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांनी अलगीकरणातच राहणे संसर्ग प्रसार रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे असून त्यादृष्टीने प्रत्येकाने जबाबदारीचे भान राखावे व आपल्या सोसायटीवर दंड भरण्याची कटू वेळ येऊ नये याकरिता कन्टेनमेंट झोनच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
----------------------------------
अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या दि.4 व 5 एप्रिल रोजीच्या निर्बंध आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 5 एप्रिल रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत.
या 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशामधील अ.क्र. 16 मध्ये ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे तेथील कर्मचारी / मजूर यांची कोव्हीड चाचणी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. तरीही या नियमांचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवणा-या विविध विभागांतील बांधकाम करणा-या 9 व्यक्तींविरोधात कारवाई करीत प्रत्येकी 10 हजार अशी एकूण 90 हजार रक्कमेची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एका कार्यालयावरही 10 हजार रक्कमेची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
यामध्ये कोपरखैरणे विभागातील सेक्टर 12 डी, बोनकोडे गांवात बांधकाम सुरू असलेल्या 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच ऐरोली विभागात दिवागाव येथे बांधकाम सुरू असलेल्या एका ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घणसोली विभागातही मजूरांची कोव्हीड चाचणी न करता बांधकाम सुरू असल्याचे आढळले अशा 5 बांधकाम करणा-या मालकांकडून प्रत्येकी 10 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच घणसोली सेक्टर 3 येथील मोनोशी कॉम्प्लेक्समधील टप टेन गॅलक्सी या आस्थापनेवरही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.