*संचारबंदीच्या पहिल्या दिवशी विशेष दक्षता पथकांनी वसूल केला 1 लाख 19 हजाराहून अधिक दंड*
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 13 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये महापालिका आयुक्त यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून जाहीर केलेल्या आदेशानुसार 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण नवी मुंबई शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून परवानगी देण्यात आली असून त्याकडे महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत बारकाईने लक्ष दिले जात आहे. संचारबंदी सुरु झाल्यापासून एका दिवसात या पथकाने 183 व्यक्ती / दुकानदार यांच्यावर कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. 1 लक्ष 19 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
यामध्ये मास्क न घालणा-या 68 व्यक्तींकडून रु. 34 हजार, सुरक्षित अंतर नियमांचे उल्लंघन करणा-या 103 व्यक्तींकडून 20 हजार 600 व सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 3 व्यक्तींकडून रु. 3 हजार अशाप्रकारे एकूण 183 व्यक्तींकडून रु. 1 लक्ष 19 हजार 600 इतकी दंड वसूली केलेली आहे.
20 मार्चपासून या 31 विशेष दक्षता पथकांनी 8213 व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून 44 लक्ष 98 हजार 800 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली असून याव्यतिरिक्त प्रत्येक विभागनिहाय पोलीसांसह नेमलेली दक्षता पथके स्वतंत्ररित्या कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करीत आहेत.
सध्या कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. ही संचारबंदी नागरिकांचा परस्पर संपर्क टाळला जाऊन कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी अत्यंत महत्वाची असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडता कोव्हीड नियमांचे पालन करावे व दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-04-2021 16:23:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update