*म्युकरमायकोसिस रूग्णशोधासह मोफत तपासणी, चाचण्या व उपचाराची महानगरपालिकेमार्फत सुविधा* *रूग्णालयात दाखल होऊन कोरोनामुक्त झालेल्या मधुमेही व्यक्तींना लक्षणांबाबत दक्षतेचे आयुक्तांचे आवाहन*
कोव्हीड 19 ची तीव्रता मागील काही आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे. तसेच प्रतिदिन केल्या जाणा-या कोव्हीड चाचण्यांच्या तुलनेत चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही 2 ते 3 टक्के इतके कमी झाल्याचे काहीसा दिलासा देणारे चित्र दिसत आहे. असे असले तरी कोरोना अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवणे गरजेचे असून त्यादृष्टीने मास्क, सुरक्षित अंतर आणि हात कायम स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचा दैनंदिन जीवनात वापर अनिवार्य आहे.
कोव्हीडच्या दुस-या लाटेची तीव्रता काहीशी ओसरत असल्याचे दिसत असतानाच मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीच्या रूपाने एक नवीनच संकट आपल्यापुढे उभे राहिलेले आहे. या संकटावर मात करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका दक्ष असून म्युकरमायकोसिसचा प्रभाव रोखण्यासाठी रूग्णशोध, तपासणी आणि उपचार अशा प्रकारची यंत्रणा सज्ज केली असल्याची माहिती देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिपव्दारे नागरिकांशी संवाद साधत 'घाबरू नका पण दक्षता घ्या' असे आवाहन करीत 'महानगरपालिका आपल्या सोबत आहे' असा विश्वास दिला आहे.
म्युकरमायकोसिसशी संबंधित चर्चा सुरू झाल्याबरोबर त्याच दिवशी आयुक्तांनी तातडीने नवी मुंबई सिटी टास्क फोर्स आणि म्युकरमायकोसिसशी संबंधित उपचार करणा-या नवी मुंबईमधील रूग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसंवादाव्दारे सविस्तर चर्चा करीत महानगरपालिकेचा म्युकरमायकोसिस संबंधित कृती आराखडा तयार केला आणि त्वरित अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली.
या कार्यवाहीच्या समन्वयासाठी या क्षेत्रातील अनुभवी नोडल अधिका-याची नेमणूक करण्यात आली. महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात म्युकरमायकोसिस बाबत तपासणी करण्याकरिता बाह्यरुग्ण सुविधा (OPD) कक्ष कार्यान्वित करण्यात आले. याठिकाणी गरज भासल्यास डायग्नोस्टिक टेस्ट्सची व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात म्युकरमायकोसिस वरील रूग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
त्यातूनही एखाद्या रूग्णाला शस्त्रक्रियेची गरज भासली तर ही शस्त्रक्रिया गुंतागुतीची असल्याने शहरातील नामांकीत सर्जनचे एक पॅनल बनविण्यात आले असून आवश्यकतेनुसार त्यांच्या सेवा उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत. म्युकरमायकोसिस बाबत तिन्ही महापालिका रूग्णालयाच्या ओपीडी मधील तपासणी, टेस्ट्स तसेच वाशी रूग्णालयातील उपचार विनामूल्य केले जातील असेही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी जनसंवादामध्ये आश्वस्त केले आहे. नागरिकांच्या मनात म्युकरमायकोसिसचे औषध उपलब्धतेबाबात तसेच ते महाग असल्याने खर्चाबाबत चिंता असून नवी मुंबई महानगरपालिका शहरातील रूग्णांना प्राधान्याने औषध कसे उपलब्ध होईल याबाबत महापालिका दक्ष असून ज्यांना परवडत नाही त्यांना औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
लक्षणे दिसू लागल्यानंतर जर रूग्णाने लगेच तपासणी केली नाही व त्यामुळे उपचारास काहीसा विलंब झाला तर हा आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. त्यामुळे लवकर उपचार सुरू होणे हे अतिशय महत्वाचे आहे हे लक्षात घेत कोरोनोवरील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झालेल्या व ज्यांना कोमॉर्बिडिटी विशेषत्वाने डायबेटिस आहे अशा व्यक्तींवर विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरव्दारे संपर्कास सुरूवात करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
म्युकरमायकोसिस करिता कोरोनामुक्त झाल्यानंतर साधारणत: 6 आठवड्यांच्या कालावधीत काळजी घेणे गरजेचे आहे हे लक्षात घेत 1 एप्रिलपासून रूग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या 6 हजाराहून अधिक रूग्णांना कॉल सेंटरव्दारे संपर्क साधण्यात आला. यासाठी म्युकरमायकोसिसशी संबंधित प्रश्नावली तयार करून कोरोनामुक्त नागरिकांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती विचारण्यात आली. त्या संवादामधून रूग्णालयात दाखल होते व ज्यांना डायबेटिस आहे असे आढललेल्या 650 व्यक्तींची वेगळी यादी तयार करण्यात आली असून त्यांना 6 ते 8 आठवडे दररोज दूरध्वनी करून लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. त्यामधील एखाद्या व्यक्तीस लक्षणे जाणवत असतील तर त्याचे संभाषण लगेच डॉक्टरांशी करून दिले जाणार असून या टेलिकम्युनिकेशन मधून डॉक्टरांना जाणवल्यास त्यांची लगेच नजिकच्या महापालिका रूग्णालयातील म्युकरमायकोसिस ओपीडी मध्ये तपासणी केली जाणार आहे व आवश्यकतेनुसार टेस्टही केल्या जाणार आहेत. त्यामध्ये एखाद्या रूग्णाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना वाशी सार्वजनिक रूग्णालयात ॲटमिटही केले जाणार आहे.
कॉल सेंटरच्या माध्यमातून केल्या जाणा-या संभाषणांमधून जाणवलेल्या 69 व्यक्तींच्या म्युकरमायकोसिस ओपीडी मधून तपासणी व टेस्ट्स करण्यात आल्या असून त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीस म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे आढळलेले नाही.
समाज माध्यमांमधून नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे 29 रूग्ण असल्याचे प्रसारित होत असून त्यातील 14 रूग्ण हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व 15 रूग्ण हे इतर शहरांतील असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी नवी मुंबई क्षेत्रातील रूग्णालये ही उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविणारी असल्याने व म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी मल्टि स्पेशालिटी रूग्णालयाची गरज असल्याने इतर शहरांतील रूग्णही इथे दाखल होत असल्याची माहिती दिली आहे. तथापि नवी मुंबई महापालिका सर्वच रूग्णांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबध्द असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तीव्र डोकेदुखी, गाल दुखणे अथवा सुजणे, नाक बंद होणे अथवा दुखणे, नाक सतत वाहू लागणे, डोळे लाल होणे अथवा सुजणे, दृष्टी अधू होणे, एकच वस्तू डबल दिसणे, दात हलू लागणे ही या आजाराची काही लक्षणे असून ती दिसू लागल्यापासून आजार गंभीर स्वरुप धारण करण्याचा कालावधी अत्यंत कमी असल्याने याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.
त्यामुळे अशी चेह-याशी संबंधीत लक्षणे आढळल्यास त्याकडे जरासेही दुर्लक्ष न करता त्वरीत महानगरपालिकेच्या वाशी. नेरुळ व ऐरोली या तिन्ही रुग्णालयांपैकी नजीकच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) कक्षात तपासणी करून घ्यावी. महानगरपालिकेच्या वतीने म्युकरमायकोसिस वरील तपासणी, चाचण्या व उपचार मोफत केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व काळजी घेत लक्षणे लपवून न ठेवता त्वरित तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या जनसंवादामध्ये केले आहे.
Published on : 23-05-2021 16:07:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update