*महापालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारीवृंदांच्या कुटुंबियांचे कोव्हीड लसीकरण*
कोव्हीडच्या पहिल्या व दुस-या लाटेत कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यामध्ये आरोग्य विभागासह नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतरही विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंदाने पहिल्या फळीतील कोरोना योध्दे म्हणून समर्पित भावनेने काम केले. या अधिकारी, कर्मचा-यांचे पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) म्हणून लसीकरण झाले होते. तथापि त्यांचे कुटुंबिय लसीकरणापासून वंचित होते आणि अधिकारी, कर्मचारी दररोज कामाला येऊन घरी परत जात होते. त्यामुळे त्यांच्या कुटुबियांनाही लस संरक्षण मिळावे अशी मागणी केली जात होती.
याबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेतला व त्यांच्या मार्गदर्शनानुसार पहिल्या टप्प्यात मुख्यालयातील आरोग्य विभागासह इतर विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्या घरातील कुटुंबियांचे आज महापालिका मुख्यालयात आयोजित विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. 410 व्यक्तींनी या लसीकरणाचा लाभ घेतला. यानंतर लगेचच महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे, विभाग कार्यालये तसेच इतर कार्यालये याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्याही कुटुंबियांसाठी विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Published on : 09-06-2021 15:11:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update