*आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीतून 2 रूग्णवाहिकांचे लोकार्पण*
नवी मुंबईत कोव्हीड नियंत्रणात ठेवण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने अतिशय चांगले काम केले असून लोकप्रतिनिधींनीही आपापल्या विभागात नागरिकांना मदत करण्याचे काम केले आहे. यामध्ये आमदार म्हणून कर्तव्यभावनेने आरोग्यसेवा ही ईश्वरसेवा आहे या जाणीवेतून महानगरपालिकेस कोव्हीड विरोधातील लढाईत बळ देण्यासाठी आमदार निधीतून 2 रूग्णवाहिका उपलब्ध करून देत असल्याचे सांगत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी लसीकरणाला गतीमानता देण्यासाठी या रूग्णवाहिकांचा वापर केला जावा अशी सूचना केली.
बेलापूर विधानसभा सदस्य श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 मधील 29 लक्ष 86 हजार निधीतून आरोग्य विभागाकरिता फोर्स ट्रॅव्हलर टी 1 पेशंट ट्रान्सपोर्ट ॲम्बुलन्स प्रकारच्या 2 रूग्णवाहिका देण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण महापालिका मुख्यालयाच्या आवारात करण्यात आले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती देत यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. आरोग्य सुविधांमध्ये रूग्णवाहिकांचे महत्व मोठे असल्याचे सांगत आरोग्याच्या दृष्टीने गोल्डन अवर्स म्हणून संबोधल्या जाणा-या अत्यंत निकडीच्या वेळी रूग्णवाहिका जीव वाचविण्याचे काम करतात असे सांगितले. त्यामुळे आमदार महोदयांनी महानगरपालिकेस उपलब्ध करून दिलेल्या या रूग्णवाहिका सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रूग्णसेवा देण्याच्या कामात उपयोगी ठरतील असे आयुक्तांनी सांगितले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, श्री. संजय काकडे, वाहन विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच इतर मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Published on : 17-06-2021 14:14:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update