नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 726 बूथवर 60971 हजाराहून अधिक मुलांना पल्स पोलिओ लसीकरण
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या वतीने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये याठिकाणी 607 स्थायी बूथ तसेच रेल्वे स्टेशन, बस डेपो, मॉल, डि मार्ट अशा 92 ठिकाणी अस्थायी बूथ तसेच दगडखाणी, उड्डाणपूलाखाली, रेल्वेलगत असलेल्या झोपड्या, बांधकाम ठिकाणे अशा ठिकाणी 28 मोबाईल बूथ अशाप्रकारे विविध जागी एकूण 726 लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. 5 वर्षाखालील साधारणत: 87 हजार लाभार्थी बालके नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.
सकाळी 8 ते सायं. 5 या वेळेत दिवसभरात नवी महानगरपालिका क्षेत्रात 5 वर्षाखालील 60 हजार 971 बालकांनी पल्स पोलीओ लसीकरणाचा लाभ घेतला. ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे काही कारणांमुळे लसीकरण झालेले नाही त्यांच्याकरिता इन्टेन्सिफाईड पल्स पोलीओ लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत असून दि. 28 जून ते 2 जुलै 2021 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलीओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याकरिता 763 पथके निर्माण करण्यात आलेली आहेत.
कोव्हीड प्रभावित काळात ही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम होत असल्याने व त्यातही 5 वर्षाखालील लहान बालकांना हे लसीकरण केले जात असल्याने सर्व बूथवर कोव्हीड प्रतिबंधात्मक सुरक्षा बाबींचे पालन करण्यात आले. तशा प्रकारच्या काटेकोर कार्यवाहीच्या सूचना बूथवर कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवक यांना प्रशिक्षणाच्या वेळी देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून सर्व बुथसमोर सुरक्षित अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली होती. बुथवर हात धुण्याची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. मास्क व हँडग्लोव्हजचा वापर लसीकरण प्रक्रियेत सहभागी स्वयंसेवकांना अनिवार्य करण्यात आला होता. स्वयंसेवकांसह पालक नागरिकांनीही मास्क परिधान करण्याचीही काळजी घेण्यात आली होती.
बालकाला लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात आले. तसेच लस देताना बालक पालकाकडेच असेल याची काळजी घेऊन बालकाची हनुवटी पालकांनाच पकडायला सांगून बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन लांबूनच लस पाजण्यात येत होती. अगदी लसीकरण झाल्याचे फिंगर मार्कींग करतानाही बाळाला स्वयंसेवकाने स्पर्श न करता बालकाचे बोट पालकांना धरण्यास सांगून फिंगर मार्कींग करण्यात येत होते. अशा प्रकारची काळजी सर्व पोलिओ बूथवर घेण्यात आली.
आपले नवी मुंबई शहर अर्थात पर्यायाने आपले राज्य आणि देश पोलिओमुक्त रहावा यादृष्टीने पल्स पोलिओ लसीकरण अत्यंत महत्वाचे असून आरोग्यप्रेमी नवी मुंबईकर पालक नागरिकांनी मोहीमेला चांगला प्रतिसाद दिला. मात्र 5 वर्षाखालील ज्या बालकांचे पल्स पोलीओ लसीकरण झालेले नसेल अशा बालकांच्या घरांना भेट देणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य स्वयंसेवकांना बालकांबाबत सत्य माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घेण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 27-06-2021 16:42:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update