रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर अशा नियमित लोकसंपर्कात राहून सेवा देणा-या संभाव्य जोखमीच्या (Potential Superspreaders) व्यक्तींकरिता आयोजित विशेष लसीकरण सत्रे यशस्वी



विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्कात असल्याने कोव्हीडच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींच्या (Potential Superspreaders) लसीकरणाकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणा-या कर्मचा-यांनंतर आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्याकरिता सेक्टर 5 वाशी येथे ईएसआयएस रूग्णालय येथे तसेच विविध सलून, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर यामधील कर्मचा-यांकरिता सानपाडा सेक्टर 8 येथील केमिस्ट भवन मध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
ईएसआयएस रूग्णालय सेक्टर 5 वाशी येथील लसीकरण सत्राचा लाभ रेस्टॉरंटमध्ये काम करणा-या 200 कर्मचा-यांनी घेतला तसेच केमिस्ट भवन येथील लसीकरण ठिकाणी 92 पुरूष व 38 महिला अशा एकूण 130 सलून / ब्युटी पार्लर मध्ये काम करणा-या कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले.
'लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन्स फॉर सेफ महाराष्ट्र' आदेशांतर्गत जारी करण्यात आलेल्या स्तरांनुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तर 3 मध्ये असून त्यानुसार शहरात दैनंदिन व्यवहारावरील निर्बंध लागू आहेत. यामध्ये रेस्टॉरंट व सलून / ब्युटी पार्लर हा एक महत्वाचा घटक असून याठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांचा इतरांशी निकटचा संपर्क येतो. त्यामुळे अशा संभाव्य जोखमीच्या कर्मचा-यांना कोव्हीड लसीचे संरक्षण मिळावे यादृष्टीने या कर्मचा-यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे.
कोव्हीड विरोधातील लढाईत अधिक लोकसंपर्कात येणारे सेवाकार्य करणा-या घटकांना कोव्हीड लसीव्दारे संरक्षित करणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्याकरिता हे विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यामधील उर्वरित घटकांकरिता आणखी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापुढील काळात अशाचप्रकारे पेट्रोल पंपावरील कर्मचारी, स्विगी/झोमॅटो/कुरिअर सेवांमधील कर्मचारी, मार्केटमधील विक्रेते, घरोघरी दूध आदी सेवा पुरविणा-या व्यक्ती, टॅक्सी/रिक्षा चालक तसेच सभागृहांमध्ये सेवाकार्य करणारे कर्मचारी अशाप्रकारे जनतेशी मोठ्या प्रमाणात संपर्क येणा-या व्यक्तींसाठीही विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येतील असे स्पष्ट केले आहे.
Published on : 03-07-2021 15:12:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update