*जलप्रलयाच्या मदतकार्यात काही कमी पडू नये याबाबत दक्षता घेण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश*
*अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांना जलप्रलयाचा प्रचंड तडाखा बसलेला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार सर्व स्तरांतून मदतकार्य केले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही यामध्ये पुढाकार घेत 2 मदतकार्य पथके 65 अधिकारी, स्वयंसेवकांसह महाडकडे तसेच 1 वैद्यकीय पथक चिपळूणकडे आवश्यक साधनसामुग्रीसह तातडीने रवाना केली आहेत. या मदतकार्याबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेत सविस्तर आढावा घेतला आणि तेथील शासकीय अधिका-यांच्या नियमित संपर्कात राहून आवश्यक मदतकार्य करणेबाबत संबंधितांस निर्देश दिले.*
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होते.
कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापूर भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेली असून विविध स्तरांतून मदतकार्य करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही यामध्ये पुढाकार घेतला असून आवश्यक साधन सामुग्रीसह 40 स्वयंसेवकांचे एक मदतकार्य पथक शनिवारी 24 जुलै रोजी आणि 20 स्वयंसेवकांचे दुसरे मदतकार्य पथक रविवारी 25 जुलै रोजी तातडीने महाडमध्ये मदतीचा हात द्यायला धावले आहे व त्यांनी मदतकार्यही सुरू केले आहे. त्याचप्रमाणे रविवारी 25 जुलै रोजी रात्री 11 वा. डॉक्टर व इतर पॅरामेडिकल स्टाफसह 15 जणांचे वैद्यकीय पथक चिपळूणकडे रवाना झालेले आहे.
*या आढावा बैठकीमध्ये आयुक्तांनी मदतकार्य पथकांसमवेत देण्यात आलेल्या आवश्यक यंत्रसामुग्री आणि स्वच्छता व जंतुनाशक विषयक साधनसामुग्रीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे वैद्यकीय पथकासमवेत देण्यात आलेल्या औषधसाठ्याची सविस्तर माहिती घेतली. या पथकांच्या नियमित संपर्कात राहून त्यांना आवश्यक साधनसामुग्री तातडीने पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी असे आयुक्तांनी मदतकार्य पथकांचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांना निर्देशित केले. त्याचप्रमाणे वैद्यकीय पथकांशी नियमित संपर्क राखण्याच्या सूचना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ .धनवंती घाडगे यांना दिल्या.*
*महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून स्थानिक प्राधिकरणाच्या मागणीनुसार त्याठिकाणी 2 डम्पर आणि 2 जेसीबी पुरविण्यात यावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे महाड व आसपासच्या गावांमधील बिकट आरोग्य स्थिती लक्षात घेऊन त्याठिकाणी आणखी 1 मदतकार्य पथक तसेच 2 वैद्यकीय पथके संबंधित प्रांत अधिकारी यांचेशी चर्चा करून रवाना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ही समर्पित भावनेने मदत करण्याची वेळ असून नवी मुंबई महानगरपालिका त्यासाठी सदैव तत्पर असल्याचे स्वकृतीतून दाखवून देण्यासारखे काम करूया अशाप्रकारे आयुक्तांनी प्रोत्साहीत केले.*
Published on : 26-07-2021 15:52:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update